पंढरपूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरसदृश परिस्थितीमुळे खरीप पिकांबरोबरच फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरी सर्व फळबागांचेही पंचनामे करण्याच्या सूचना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिले, तर कर्जमाफीची हीच योग्य वेळ आहे. एनडीआरएफच्या मर्यादेत राहून मदत असे सरकारने सांगू नये, असे राष्ट्रवादी (शरद पवार) कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सरकारला ठणकावले. पूरग्रस्त गावांची पाहणी या दोन्ही नेत्यांनी केली.

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी करमाळा तालुक्यातील कोर्टी, सरपडोह व बिटरगाव श्री या गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्या प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, की सिना नदीच्या महापुरामुळे नदीकाठावरील शेती पूर्णतः उद्ध्वस्त झाली असून, काही ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. जिल्ह्यातील नुकसान लक्षात घेता येथील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत शासनाकडून मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. या वेळी करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे, मंगेश चिवटे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप, महेश चिवटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी (शरद पवार) कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील यांनी माढा तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भेटी दिल्या. प्रसंगी गाडी सोडून थेट ट्रॅक्टरमध्ये बसून जयंत पाटील यांनी शेतकऱ्याचा बांध गाठला. या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार अभिजित पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते. एनडीआरएफच्या मर्यादेत राहून एवढीच मदत देता येते, असे सरकारने सांगू नये. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. मुख्यमंत्री योग्य वेळी कर्जमाफी करू, असे म्हणतात. हीच योग्य वेळ आहे. राज्यात कर्जमाफी जाहीर करावी आणि बँकांना सांगून नवे कर्ज उपलब्ध करून द्यावे. दसऱ्यापूर्वीच शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

शेतकऱ्याला आज एकरी किमान ५० हजार रुपयेप्रमाणे मदत दिली पाहिजे. यामध्ये पंचवीस ते तीस हजारांचा पहिला हप्ता दसऱ्यापूर्वी देणे गरजेचे आहे. उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला सरकारने दिलासा दिला पाहिजे अन्यथा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी आपणास माहिती आहे, असा टोला पाटील यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्र्यांनी ‘ओला दुष्काळ हा केवळ मराठीतील शब्द आहे’ अशा दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल माझे भाष्य राखून ठेवतो. कारण मी बोललो, तर ते राजकारण करतोय, असे बोलले जाईल, असेही जयंत पाटील म्हणाले. बीड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी दौरा करत असताना व नागरिकांशी संवाद साधताना ‘तुझे लव्ह मॅरेज आहे का?’ असा सवाल केला होता. यावरून पुरासारख्या व इतर परिस्थितीमध्ये प्रत्येकाने संवेदनशीलता पाळली पाहिजे. थट्टेचा, विनोदाचा हा भाग नाही. लोकांसमोर होऊन लोकांचे प्रश्न मांडले पाहिजेत, असेही या वेळी पाटील म्हणाले.