गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच, पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचं बोललं जात होतं. या सर्व चर्चा पंकजा मुंडे यांनी फेटाळल्या आहेत. मी कधीही काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना प्रत्यक्षपणे भेटले किंवा पाहिलं नाही, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. त्या वरळीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, “२०१९ साली मी भाजपाची उमेदवारी होती. तेव्हा माझा पराभव झाला. माझ्या पराभवानंतर भाजपात अनेक निर्णय झाले. त्या निर्णयात मी सामील झाले नसल्याने आणि तिकीट नाकारल्याने पक्षातून बाहेर जाणार अशा चर्चा रंगल्या.”
हेही वाचा : “मी राजकारणातून ब्रेक घेणार आहे”, पंकजा मुंडेंची मोठी घोषणा; म्हणाल्या, “मला अंतर्मुख होऊन…!”
“पण, दसरा मेळावा, ३ जून आणि १२ डिसेंबरला मी माझी भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली आहे. सातत्याने माझी भूमिका मांडणे माझ्या नैतिकतेवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. त्यामुळे मी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ‘पंकजा मुंडे आमच्याकडे आल्या, तर चांगलं आहे’ अशी विधाने केली. या गोष्टीला मी हलक्यात घेतलं,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
हेही वाचा : “विधान परिषदेचा अर्ज भरण्याच्या दहा मिनिटे आधी फोन आला अन्…”, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली मनातली खदखद
“अलीकडे आलेल्या एका बातमीने मला अंर्तमुख केलं. त्यात मी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची दोनदा भेट घेतली. आणि मी काँग्रेसच्या वाटेवर आहे, असं सांगण्यात आलं. मी कधीही राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना प्रत्यक्षपणे भेटले किंवा पाहिलं नाही. कोणत्याही बातमीवर प्रश्नचिन्ह टाकून कायदेशीर प्रश्न सोडवू शकता. परंतु, माध्यमांनी कोणतीही बातमी देताना स्त्रोत देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या माध्यमांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार आहे. त्यांनी केलेल्या कथनाचे पुरावे न्यायालयात सादर करावे लागतील. माझे करियर कवडीमोलाचे नाही,” असेही पंकजा मुंडेंनी म्हटलं.