परभणी : खरिपाच्या पेरणीनंतर सर्वत्र पावसाची प्रतीक्षा असताना उद्या, बुधवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल तर गुरुवारी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या अंदाजानुसार बुधवारी व गुरुवारी (दिनांक २५, २६) तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर शुक्रवारी, शनिवारी (दि.२७ व २८) तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसांत कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक २६ जून ते ३ जुलैदरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सर्वत्र शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पुढील चार दिवस हे मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत पावसाचे असल्याचा हा अंदाज आहे. हा होणारा पाऊस सरासरी एवढाच असल्याचे सांगितले गेले आहे. अधिकच्या व दमदार पावसाची प्रतीक्षा असताना पुढील चार दिवसांत केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज सांगण्यात आला आहे.