परभणी : नगरपालिकांची निवडणूक रंगात येताच आता पैशाला पाय फुटू लागले आहेत. पूर्णा येथील राजमुद्रा चौक परिसरात मंगळवारी (दि.१८) नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वाहनातील ३० लाख रूपयाची रक्कम आचारसंहिता पथकाचे प्रमुख नारायण मिसाळ यांनी तपासणीअंती संशयित असल्यावरून जप्त केल्याची घटना घडली.
आचारसंहिता पथक प्रमुख नारायण मिसाळ, विस्तार अधिकारी शिवानंद लेंडाळे, पुरी, राठोड यांचे तपासणी पथक साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास राजमुद्रा चौक परिसरात वाहन क्रमांक एमएच २६ बी एक्सएक्स ६५९६ ची तपासणी केली असता वाहनातील बॅगमध्ये तीस लाख रुपयांची रक्कम आढळून आली. पथकाने संपूर्ण वाहनाचे चित्रीकरण करून पंचनामा करत रक्कम जप्त केली. जप्त रक्कम येथील कोषागार कार्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांचे नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, गटविकास अधिकारी नारायण मिसाळ, पोलिस निरीक्षक विलास गोबाडे आदींच्या पथकाने केली. दरम्यान आचारसंहितेच्या काळात जप्त होणाऱ्या मोठ मोठ्या काही तांत्रिक बाबी पूर्ण करून संबंधितांना दिल्या जातात असा आजवरचा अनुभव आहे. एवढेच नाही तर मतदानाआधी थेट मतदारांपर्यंत पैसे पोहोचवण्याचे प्रकार सर्रास घडतात त्यावरही कोणतीच उपाययोजना आचारसंहिता पथकाला करता येत नाही असा आजवरच्या निवडणुकांचा अनुभव आहे.
लोकसभा विधानसभा निवडणुकीप्रमाणेच पालिकांच्या निवडणुकातही उमेदवारांकडून पैशाचा वापर होणार आहे. राजकीय पक्षांनी नगरसेवक पदासाठी व नगराध्यक्षपदासाठीही इच्छुकांची आर्थिक परिस्थिती पाहून उमेदवारी दिलेली आहे. किंबहुना सर्वाधिक पैसे कोण खर्च करू शकतो हाच निकष उमेदवारीसाठी ठेवण्यात आला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बहुतेक ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झाले. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला जी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे ती मर्यादा केवळ उमेदवारी अर्ज दाखल करतानाच उमेदवारांनी ओलांडली आहे. प्रचंड शक्ती प्रदर्शनासह वाजत गाजत उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यावर उमेदवारांनी मोठा खर्च केला आहे. या पुढच्या काळात ध्वनिक्षेपक, वाहने, जाहीर सभा, बैठका, पदयात्रा, फलकबाजी, जेवणावळी, झेंडे, रुमाल, पत्रके अशा सर्वच बाबींवर उमेदवारांचा खर्च होणार आहे.
यापुढे नगराध्यक्ष व नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी आपापल्या प्रभागात प्रचंड खर्च करण्याची तयारी ठेवली असून सध्याच ढाबे व हॉटेल्स कार्यकर्त्यांच्या गर्दीने तुडुंब भरलेले पाहायला मिळत आहेत. मतदानाच्या आधी शेवटच्या दोन दिवसात मतदार निहाय जे वाटप होते ते पालिकांच्या निवडणुकीतही होण्याची चिन्हे आहेत. नगरसेवक पदासाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी उमेदवारांनी केलेली आहे. नगराध्यक्षपदासाठी हाच खर्च कोट्यावधी रुपयांच्या घरात जाणार आहे. संबंधित उमेदवारांनी निवडणूक लागण्यापूर्वीच पैशाची तरतूद करून ठेवलेली आहे. नजीकच्या काळात या निवडणुकांमध्ये पैशाचा भरमसाठ वापर होणार असून कार्यकर्त्यांनी त्यासाठी नेत्यांकडे डोळे लावले आहेत.
अशी आहे खर्च मर्यादा
नगरपरिषदाच्या निवडणुकांतील थेट अध्यक्ष आणि सदस्यपदाच्या उमेदवारासाठी राज्य निवडणूक आयोगाने यावेळी निवडणूक खर्च मर्यादा वाढविली आहे. ‘ब’ वर्ग नगरपरिषद थेट अध्यक्ष रु. ११ लाख २५ हजार तर सदस्य- रु. ३ लाख ५० हजार, तसेच ‘क’ वर्ग नगरपरिषद थेट अध्यक्ष रु. ७ लाख ५० हजार, सदस्य- रु. २ लाख ५० हजार अशी ही मर्यादा आहे. उमेदवारांच्या खर्चाला आता प्रारंभ झाला आहे. प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत होणारा उमेदवारांचा खर्च आणि हे आकडे यात प्रचंड तफावत पाहायला मिळत आहे.
