महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे तेव्हा ज्या काही पूजा घालायच्या असतील तर त्या स्वतःच्या घरी घाला असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पूजा करण्याला आमचा विरोध नाही. पण अशा पूजा शैक्षणिक संकुलात नको. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाच्या पूजेवरुन झालेल्या वादावर बोलताना त्यांनी हे विधान केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांच्या समस्यांबाबत आज पुणे महापालिकेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्या बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव आणि ग्रामस्थ देखील उपस्थित होते. त्यानंतर पत्रकाराशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली.

राज्यात महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहे. त्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की,राज्यात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिलांवरील प्रश्नांकडे मुख्यमंत्री गांभीर्याने पाहत नसून त्यांनी पक्षाच्या प्रचाराकड़े कमी लक्ष द्यावे आणि महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे तसेच त्यांच्याकडे गृहमंत्रीपद असल्याने त्यांना जर ते जमत नसेल तर त्यांनी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली.

फर्ग्युसन कॉलेजमधल्या सत्यनारायणाच्या पूजेवरून वाद
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात श्रावणमासानिमित सत्यनारायण पूजा करण्यात आली. या पूजेवरून वाद झाला. काही विद्यार्थी संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे महाविद्यालय परिसरात तणावाचे वातवारण निर्माण झाले होते.

फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्यांच्या कार्यालयात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले. याच कार्यालयाबाहेर असणाऱ्या फलकावर सर्व विद्यार्थ्यांनी पूजेचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले होते. या पूजेची माहिती विद्यार्थ्यांना मिळताच त्यांनी प्राचार्यांना घेराव घालत जाब विचारला. मागील अनेक वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून सत्यनारायणाची पूजेचे आयोजन केले जात असल्याने या वर्षीही पूजेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली. पूजेचे आयोजन करुन आम्ही अनेक वर्षांपासून सुरु असलेली ही परंपरा पाळल्याचे स्पष्टीकरण या वादावर त्यांनी दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Perform puja at your home supriya sule