Phaltan Doctor Suicide Case Jitendra Awhad : फलटणच्या जिल्हा उपरुग्णालयात काम करणाऱ्या एका डॉक्टर तरुणीने तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी या डॉक्टर तरुणीने एक चिठ्ठी आणि तळहातावर लिहिलेल्या मजकूरात फलटणमधील पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि आणखी एका व्यक्तीवर बलात्कार व छळ केल्याचे, तसेच आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आरोप केले होते. पोलिसांनी गोपाळ बदनेला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, या आत्महत्या प्रकरणावरून विरोधी पक्ष सरकारवर, गृहमंत्रालयावर टीका करत आहेत, तसेच वेगवेगळे आरोप केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केला आहे की “ही आत्महत्या नसून ही संस्थात्मक हत्या आहे. डॉक्टर तरुणीवर चुकीचे व नियमबाह्य अहवाल देण्यासाठी, तसेच काही पोस्टमार्टेम रिपोर्ट (शवविच्छेदन अहवाल) बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता. ती या सगळ्यांशी एकटी लढत होती. मात्र, सगळ्या त्रासाला कंटाळून तिने जीवन संपवलं.”
जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “फलटणमधील डॉक्टर तरुणीची आत्महत्या नसून ही संस्थात्मक हत्या आहे. एका शेतकरी आई-बापाने मोल मजुरी करून, ऊसतोडणी करून आपल्या लेकीला जिद्दीने घडवले, ती कर्तबगार लेक म्हणजे ही डॉक्टर तरुणी! चुकीचे नियमबाह्य अहवाल देण्यासाठी तसेच काही पी. एम. रिपोर्ट बदलण्यासाठी तिच्यावर स्थानिक पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून प्रचंड दबाव टाकत होते. पण, डॉक्टर तरुणी कोणत्याही दबावाला न घाबरता आपली आरोग्यसेवा प्रामाणिकपणे करत होती.”
“ती अनेक महिन्यांपासून या प्रशासनातल्या असूरी शक्तींविरुद्ध नियतीचा लढा एकटी लढत होती. पोलीस व प्रशासन आरोग्य विभागातील वरिष्ठ – कनिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने एकत्र येऊन केलेली संस्थात्मक हत्या आहे. आज आवाज नाही उठवला तर ही जुलमी राजवट महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये अशा आत्महत्या घडवून आणेल.”
आरोपीला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने शनिवारी रात्री उशीरा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यानंतर त्याला फलटणच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायालयाने बदने याला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
