कराड : कराडलगतच्या सैदापूर येथील जिव्हाळा ढाब्यासमोरील एका इमारतीमध्ये सुरु असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून तीन जणांना अटक केली, तर त्यांच्याकडून ११ लाखांचा मुद्देमाल आणि बनावट दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. अटकेतील तिघांना न्यायालया समोर हजर केले असता, या तिघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत कराड शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयूर कृष्णदेव कदम व मंदार कृष्णदेव कदम (दोघेही रा. करवडी), विजय शिवाजी निगडे (रा. शिरवळ, ता. खंडाळा) अशी याप्रकरणी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कराड विभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात सदर ठिकाणी बेकायदारीत्या दारू तयार केली जात असल्याचे दिसून आले आहे. छाप्यावेळी अपार्टमेंटसमोर उभ्या असलेल्या दोन मोटारगाड्यांमध्ये दारूने भरलेले कॅन होते. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी थांबलेल्या तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता तिघांनीही रसायनमिश्रित बनावट दारू तयार करीत असल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी तेथून १० लाख ५० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारगाड्या, १० हजार ५०० रुपये किमतीचे २१० लिटर स्पिरिट, एक हजार ७०० रुपये किमतीचे टैंगो इसेन्स, एक हजार ५०० रुपये किमतीचे फिल्टर, दोन हजारांची पाण्याची टाकी, तसेच बनावट दारूच्या बाटल्या असा १२ लाख ३८ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय सांडगे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
(सखोल तपास होत नाही)
पुणे – बंगळुरू महामार्गावरील कराड तालुक्यातील उंब्रज आणि तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरचेवर गोवा बनावटीची बोगस आणि आरोग्यास घातक असलेली दारू ट्रॅकभर आणि टेम्पोभर सापडत असते. पण, ही दारू कुठे बनली आणि त्याचे खरेदीदार कोण, किती दिवसांपासून हे रॅकेट सुरू आहे. याचा सखोल तपास होत नाही. आतातर, कराडची विद्यानगरी असलेल्या परिसरातच बेकायदा दारु बनवण्याचा कारखाना उजेडात आला आहे. त्यामुळे बनावट दारु निर्मिती आणि विक्री करणारे गुन्हेगार सोकावले असल्याचेही उघड होत असल्याने या गुन्ह्यांचा सखोल तपास होणे गरजेचे असून, या प्रकरणी कराड शहर पोलीस निष्पक्षपणे सखोल तपास करतात हे पहावे लागेल.