राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत अजित पवार हे भाजपा-शिवसेनेने स्थापन केलेल्या सत्तेत सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादीतले अनेक आमदार, खासदार, नेते अजित पवारांबरोबर आहेत. अजित पवार आणि त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथही घेतली. अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे सर्वच नेते त्यांच्याबरोबर गेले आहेत. परंतु शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हेदेखील अजित पवारांबरोबर आहेत, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रफुल्ल पटेल अजित पवारांबरोबर कसे काय गेले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर आज (५ जुलै) स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीवेळी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, आपला हा पक्ष खूप पुढे न्यायचा आहे. त्यासाठी माझा अजितदादांना पाठिंबा आहे. त्यांच्या मागे माझी ताकद उभी आहे. प्रफुल्ल पटेल या मंचावर का आणि त्या मंचावर का नाही? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. प्रफुल्ल पटेल त्या मंचावर का नाही? हा या देशातला सर्वात मोठा प्रश्न आहे, त्याचं उत्तर हा देश शोधत आहे, संपूर्ण महाराष्ट्र शोधत आहे. त्याचं उत्तर मी तुम्हाला आज देणार नाही. त्याची योग्य वेळ येऊ द्या.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, या प्रश्नाचं सविस्तर उत्तर मी तुम्हाला वेळ आल्यावर देईन. तुम्हाला आवश्यक असलेला खुलासा मी करणार आहे. आज छगन भुजबळ यांनी त्याचे संकेत दिले आहेत. धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनीही सांगितलं आहे. मी त्यावर सविस्तर बोलेन. त्यावर आपण कधी ना कधी चर्चा नक्कीच करणार आहोत आणि तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे.

हे ही वाचा >> “शरद पवार आमचे विठ्ठल पण त्यांना बडव्यांनी…” छगन भुजबळ आक्रमक

प्रफुल्ल पटेल म्हणाले, काहीजण अजितदादांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते किती चुकीचे आरोप करत आहेत हे त्यांनाही माहिती आहे.