राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून दोन गट तयार झाले आहेत. हे दोन्ही गट नेहमीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत असतात. दरम्यान, शरद पवार यांनी अनेकदा दावा केला आहे की, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून माझ्याकडे भाजपात जाण्याचा, भाजपाबरोबर युती करण्याचा आग्रह करत होते. पवारांच्या या आरोपांना पटेल, तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील नेत्यांनी अनेकदा उत्तरही दिलं आहे. दरम्यान, शरद पवार यांनी पटेल यांच्यााबबत नवीन वक्तव्य केलं आहे. पवार म्हणाले, “प्रफुल्ल पटेल हे २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनचं माझ्याकडे भाजपात जाण्याचा आग्रह करत होते”. पवारांच्या दाव्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी त्यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे.

‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीवेळी शरद पवार म्हणाले, “२००४ सालापासून, त्या वर्षीच्या निवडणुकीच्या आधीपासून प्रफुल्ल पटेल हे मला सतत येऊन म्हणायचे की, आपण भाजपात जाऊया. ते नेहमी म्हणायचे, या निवडणुकीत आपला पक्ष टिकणार नाही. देशात अटल बिहारी वाजपेयी यांना पर्याय नाही. त्यामुळे आपण सगळे जण भाजपात जाऊया. पटेल माझ्याकडे येऊन तासनतास मला आग्रह करायचे. शेवटी मी त्यांना नाही म्हणून सांगितलं. त्यानंतरही ते थांबले नाहीत. मग मी त्यांना सांगितलं की, तुम्ही भाजपात जा. अखेर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.”

शरद पवारांच्या या दाव्यावर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पटेल यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पवार यांचा दावा मान्य केला आहे. पटेल म्हणाले, “होय, मी शरद पवारांकडे २००४ सालापासून भाजपाशी युती व्हावी असा आग्रह धरला होता. तरी पण त्यांचा मान, सन्मान आणि त्यांच्याविषयीचा आदर असल्याने मी त्यांच्याबरोबर राहिलो. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी राहीन. संधी मिळाल्यावर देशासाठी आणि जनतेसाठी चांगलं काम करून शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा सन्मान वाढवण्याच्या दृष्टीने मी सतत प्रयत्न केले.”

हे ही वाचा >> “२०१९ मध्ये शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, पण…”, राऊतांनी सांगितल्या आतल्या घडामोडी; फडणवीस-तटकरेंचा उल्लेख करत म्हणाले…

प्रफुल्ल पटेल म्हणाले, “हे देखील खरे आहे की, १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये सतत अपमान होत असल्यामुळे शरद पवारांना कॉंग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करावी लागली. तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो आणि हे ही तितकेच खरे आहे की, २००४ मध्ये कॉंग्रेसने आमच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपद देणं नाकारलं. शरद पवार साहेब, तुमच्याबद्दलचा आदर कायम आहे!”