नांदेड : मराठा समाजाला ओबीसींमध्ये अंतर्भूत करता येत नाही आणि तसे केले तर ते सर्वोच्च न्यायालयही मान्य करणार नाही. यापूर्वी तसा प्रकार दोनवेळा झालेला आहे. परंतु, तो सर्वोच्च न्यायालयाने मान्य न करता विरोधात निकाल दिलेला आहे, असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांचे ओबीसींमधूनच मराठ्यांना आरक्षण द्यायचे, यासाठी होत असलेले आंदोलन चुकीच्या पद्धतीचे असून, जरांगे यांना सत्तेतील मराठ्यांकडून निधीचा पुरवठा होत असल्याचा आरोप येथे मंगळवारी केला.

नांदेडमध्ये ओबीसी व भटक्या विमुक्त महासंघाकडून बुधवारी ‘कुणबी-मराठा व मराठा-कुणबी’ यासंदर्भाने २ सप्टेंबर रोजी राज्य शासनाने काढलेला अध्यादेश रद्द करावा, यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी ॲड. आंबेडकर येथे आलेले असून, त्यापूर्वी येथे घेतलेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते.

ॲड. आंबेडकर म्हणाले, मराठा समाजात दोन घटक आहेत. एक सत्तेतील मराठा आणि दुसरा रयतेतील मराठा. रयतेतील मराठा समाज हा शिवाजी महाराजांसोबत राहिलेला आहे. परंतु, सत्तेतील मराठा हा त्या-त्या काळातील सत्ताधीशांसोबत राहिलेला आहे. सत्ताधीशांसोबतच्या मराठा समाजाला रयतेतील मराठा पुढे यावा, असे कधीही वाटले नसून, जोपर्यंत रयतेतील मराठा समाज सत्तेतील मराठ्यांकडून फारकत घेत नाही, तोपर्यंत त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास शक्य नाही. सत्तेतील मराठा समाज किमान हमी भावाचा कायदाही होऊ देत नाही, असाही आरोप त्यांनी केला.

बुधवारच्या मोर्चासाठी ओबीसी व भटक्या विमुक्त महासंघाचे नेते किसन चव्हाण यांनी निमंत्रण दिल्यामुळे आपण मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी येथे आलेलो आहोत, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीचीही अगोदरपासून ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये जो तणाव चाललेला आहे, त्यावर सुसंवादाची भूमिका आहे. आम्हाला ओबीसींनाही आणि रयतेतील मराठ्यांनाही न्याय द्यायचा आहे. फसवा-फसवीचा खेळ आम्हाला करायचा नाही. जरांगेंचे आंदोलन चुकीचे आंदोलन आहे. रयतेच्या मराठ्यांमधील लोकसंख्येवर ते चालते आणि त्याला सत्तेतील मराठा निधी पुरवतो, असेही आंबेडकर म्हणाले.

बच्चू कडू काय करत होते ?

शेतकऱ्यांना आवाहन आहे की, तुम्हाला गाड्याच फोडायच्या आहेत, तर त्या सत्ताधाऱ्यांच्या फोडा. तुम्हाला न्याय मिळेल. दुखणं दुसरीकडे, औषध तिसरीकडे देऊन चालणार नाही, असे सांगत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनावर बोलताना मंत्रिपद असताना कडू काय करत होते, असा प्रश्न उपस्थित केला.