वंचित बहुजन आघाडी तसेच उद्धव ठाकरे गट यांच्यात युती झालेली आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर तसेच उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या युतीची अधिकृतपणे घोषणा केली. या युतीनंतर राज्यात नव्याने भीमशक्ती-शिवशक्ती एकत्रिकरणाचा प्रयोग केला जात असून आगामी काळात राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वंचित आणि ठाकरे गटात युती झालेली असली तरी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष भाजपाची बी टीम आहे, असा आरोप केला जातो. मागील विधानसभा निवडणुकीत वंचितमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार पराभूत झाले, असा दावा केला जातो. यावरच आता प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> निवडणूक आणि उमेदवारीबद्दल विचारताच सुषमा अंधारेंचे खास उत्तर; म्हणाल्या, “आमच्याकडे लेट पण…”

मला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही

“मी अजूनही एसटीने फिरतो. मी अजूनही रेल्वेने फिरतो. त्यामुळे माझी परिस्थिती जशी आहे तशीच आहे. मी जशी भाजपावर टीका करतो, तशी टीका करणारा दुसरा कोणताही नेता नाही. जे सो कॉल्ड विचारवंत आहेत त्यांनी त्यांच्याजवळचे थोतांड त्यांच्याजवळच ठेवावे. मला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही,” असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >> संघ, भाजपाच्या विचारधारेवर बोलताना प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले; “मला भाजपासोबत जायचे असेल तर..”

राजकीय पक्ष म्हणूनच भूमिका घेतली पाहिजे

“मागील विधानसभा, लोकसभेच्या निकालात अनेक ठिकाणी आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे आमचे उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे पाडले असा आम्ही आरोप करावा का? काँग्रेस, राष्ट्रवादी भाजपाची बी टीम आहे असे आम्ही म्हणावे का? तुम्ही राजकीय पक्ष असल्यामुळे राजकीय पक्ष म्हणूनच भूमिका घेतली पाहिजे. सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे,” असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar comment on allegations of vba being b team of bjp prd