महाविकास आघाडीचे नेते गेल्या अनेक महिन्यांपासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मविआत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत होते. मविआने वंचितला महाराष्ट्रात लोकसभेच्या पाच जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र वंचितने तो प्रस्ताव नाकारत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. वंचितने आतापर्यंत महाराष्ट्रातील २० हून अधिक मतदारसंघांमध्ये त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी खोचक भाषेत वंचितवर टीका केली आहे. वडेट्टीवार म्हणाले, पहिल्यापासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत चर्चा चालू होती. म्हणजे साखरपुड्यापासून चर्चा सुरू झाली होती. परंतु, आवश्यक हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने लग्न मोडलं असावं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजय वडेट्टीवार यांच्या या टीकेला प्रकाश आंबेडकर यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी काही वेळापूर्वी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. आंबेडकर म्हणाले, निवडणुकीआधी युत्या आणि आघाड्यांमध्ये जागावाटप केलं जातं. महाविकास आघाडीत कालपर्यंत जागावाटप झालंच नव्हतं. त्यामुळे त्यांनी (विजय वडेट्टीवार) हुंड्याची चर्चा करू नये. आम्ही काही गोष्टी बाहेर काढायला गेलो तर इतर काहींना जसं समाजात फिरणं अवघड झालं तसंच होईल. तुम्ही माझ्या आणि वंचितच्या नादी लागू नका. आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट आहोत.

हे ही वाचा >> “नाराजी दाखवायची असेल तर आम्ही…”, सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांचा काँग्रेसला सूचक इशारा

विजय वडेट्टीवार काय म्हणाले होते?

विजय वडेट्टीवार म्हणाले, महाविकास आघाडीशी अखेरपर्यंत चर्चा करीत राहू असे ॲड. प्रकाश आंबेडकर सांगत राहिले, त्याचबरोबर महाविकास आघाडीत भांडणं आहेत, ती त्यांनी आधी सोडावावी मग त्यांच्याशी चर्चा करण्याचा आग्रह आंबेडकरांनी केला होता. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा चालू असतानाच निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. तरीही नाना पटोले यांनी काँग्रेसच्या कोट्यातून त्यांना दोन जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु ॲड. आंबेडकर यांनी वराती मागून घोडे संबोधून तो प्रस्ताव फेटा‌ळला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar warning to vijay wadettiwar dont get in my way or vanchit bahujan aghadi asc