Prem Birhade vs Modern College Pune : लंडनमध्ये नोकरी मिळालेल्या प्रेम बिऱ्हाडे या तरुणाने पुण्यातील महाविद्यालयावर जिथून त्याने शिक्षण घेतलं त्या मॉडर्न महाविद्यालयावर जातीयवादाचा गंभीर आरोप केला होता. त्याने दावा केला आहे की “मला लंडनमधील एका कंपनीत नोकरी मिळाली होती. मात्र, त्या कंपनीने महाविद्यालयाकडे माझ्या शिक्षणासंबंधी पडताळणी प्रमाणपत्र मागितलं होतं. मात्र, मी दलित असल्यामुळे त्यांनी हे प्रमाणपत्र दिलं नाही. आम्ही दलितांनी पुढे गेलेलं काही लोकांना बघवत नाहीये.” त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रेमची बाजू मांडली होती.

या आरोपांवर आता महाविद्यालयाने प्रतिक्रिया दिली आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव व मॉडर्न महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्यामकांत देशमुख यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “प्रेम बिऱ्हाडे व प्रकाश आंबेडकर यांचे दावे तथ्यहीन आहेत. मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात त्याने तीन वर्षांचा बीबीए अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. २०२०-२१ ते २०२२-२३ दरम्यान तीन वर्षांत त्याने हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर तो यूकेला गेला.”

“आम्हाला प्रेम बिऱ्हाडेचा अभिमान”

श्यामकांत देशमुख म्हणाले, “प्रेम बिऱ्हाडे युकेला जाऊन शिकतोय याचा आम्हाला अभिमान आहे. त्याची गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र, उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आणि त्याने मागितलेलं शिफारसपत्र देखील आम्ही दिलं आहे. त्यानंतरही नोकरी गेली असा दावा केला जातो, तो नोकरीपासून वंचित राहतोय की काय असा संभ्रम निर्माण केला जात आहे, परंतु असं अजिबात नाही.”

कंपनीने माहितीसाठी डेडलाइन दिली नव्हती : श्यामकांत देशमुख

“मुळात हा जॉब त्याला लागला नव्हता. त्यासाठीची प्रक्रिया म्हणून एका थर्ड पार्टीने आमच्याकडे कागदपत्र पडताळणीसाठी ई-मेल पाठवला होता. विद्यार्थ्याने नव्हे, कंपनी व महाविद्यालयीन करस्पॉन्डंट म्हणून पहिला मेल ३० सप्टेंबर रोजी आम्हाला मिळाला होता. परंतु, त्या मेलमध्ये कुठेही डेडलाईन सांगितली नव्हती. म्हणजे अमुक तारखेपर्यंत ही सगळी कागदपत्रं पडताळून आम्हाला द्या असं सांगितलं नव्हतं.”

सगळी कागदपत्र कंपनीला पाठवली आहेत : मॉडर्न महाविद्यालय

“यूकेमधील हीथ्रो विमानतळावर एव्हिएशनशी संबंधित नोकरीसाठी ही पडताळणी होणार होती. त्यासाठी कंपनीला पाच वर्षांचं स्क्रीनिंग अभिप्रेत होतं. तसा उल्लेख त्या ई-मेलमध्ये करण्यात आला आहे. प्रत्यक्षात प्रेम बिऱ्हाडे हा विद्यार्थी आमच्याकडे केवळ तीन वर्षांसाठी होता, पाच वर्षांसाठी नाही. त्याच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी कंपनीने पर्सनल रेफरन्स सोल्युशन नावाच्या एका थर्ड पार्टी कंपनीला पडताळणीची कामगिरी सोपवली होती. त्यामध्ये एव्हिएशन अ‍ॅक्ट व एव्हिएशन मेरिटाइम अ‍ॅक्टचा उल्लेख केला होता. कागदपत्रांच्या बाबतीत मोठी सुरक्षितता व गोपनीयता बाळगणं आणि तशीच माहिती उपलब्ध करून देणं गरजेचे होतं जी आम्ही कंपनीला पुरवली आहे.”

प्रेम बिऱ्हाडेची नोकरी गेलीय असं म्हणता येणार नाही : श्यामकांत देशमुख

श्यामकांत देशमुख म्हणाले, आम्हाला ९ ऑक्टोबर रोजी दुसरा मेल आला. त्यात त्यांनी पुन्हा एकदा पाच वर्षांच्या स्क्रीनिंगबाबत विचारलं होतं. आम्ही तीन वर्षांचं स्क्रीनिंग पुरवलं आणि पोलिसांशी पत्रव्यवहार सुरू केला. १४ ऑक्टोबर रोजी आम्ही त्यांना बोनाफाइड सर्टिफिकेट व कंपनीने मागितलेला प्रोफार्मा भरून ई-मेल केला. या सगळ्यात प्रेम बिऱ्हाडेचा जॉब गेलेला नाही. काल सकाळी ११.३१ वाजता आम्हाला एक ई-मेल आला आहे त्यात त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की माहिती फर्निश करा, जेणेकरून पडताळणीनंतर प्रेमला जॉब देता येईल. आम्ही सगळी कागदपत्रं दिली आहेत. दोन वर्षांच्या स्क्रीनिंगची माहिती पोलिसांकडून आम्हाला मिळाली तर आम्ही ती देखील देऊ. या सगळ्यात प्रेमचा जॉब गेलाय असं म्हणता येणार नाही.”