उद्धव ठाकरे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. तत्पूर्वी बुधवारी सायंकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र औरंगाबाद शहराच्या नामकरणाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. अन्य मार्गांचा वापर करु, असे खासदार जलील म्हणाले. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी नागरिकांसोबत गद्दारी केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माध्यमांशी बोलताना जलील म्हणाले की, “मरता क्या न करता, सत्ता जात असताना त्यांना संभाजी महाराजांची आठवण आली. २५-३० वर्षांपूर्वी केलेली घोषणा त्यांनी केवळ निवडणुकीचा मुद्दा बनवला होता. आता आपली खुर्ची जात असताना त्यांनी हा निर्णय घेतला. मी शिवसेनेला सांगू इच्छितो की इतिहास बदलला जाऊ शकत नाही, नावं बदलली जाऊ शकतात, तुमच्याकडे दाखवायला काहीच नाही, त्यामुळे तुम्ही हा निर्णय घेतला. औरंगाबादची जनता ठरवेल औरंगाबादचं नाव काय असायला हवं किंवा नको,” असंही जलील यावेळी म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, “अखेर तुम्ही यातून काय सांगू इच्छित आहात, औरंगाबाद शहराला ८-१० दिवसांतून एकदा पाणी मिळतं. हे उद्धव ठाकरे यांच्यामुळेच आहे. त्यांच्या पार्टीने आणि त्यांच्या पार्टीच्या नेत्यांनी गेल्या २५-३० वर्षात लोकांना फक्त लुटण्याचं काम केलंय. आज तेच नेते तिकडे आनंद साजरा करत आहोत. नाचत आहेत. त्यामुळे माझा त्यांना सवाल आहे, यानंतर कोणता मुद्दा घेऊन तुम्ही नाचणार आहात. जनतेच्या भल्यासाठी तुम्ही काही केलं असतं, तर तुम्हाला आम्ही डोक्यावर घेतलं असतं, पण तुम्ही रस्त्याचं, शहरांचं आणि गल्ल्यांचं नाव बदलून जात आहात, याचा तीव्र निषेध करतो.”

हेही वाचा- उद्या मुंबईत राडा होणार नाही! उद्धव ठाकरेंचं शांततेचं आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, “मी त्या दलालांचा देखील तीव्र निषेध करतो, जे स्वत:ला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते मानतात. औरंगाबाद शहरात यांचे जिथे फोटो दिसतील, तिथे त्यांच्या फोटोला चपलांचा हार घाला, असं आवाहन मी एमआयएमच्या कार्यकर्त्यांना करतो. कारण राजकारणासाठी ते कोणत्या पातळीवर घसरले आहेत, ते दिसतंय. आज औरंगाबाद शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दलाल नेते रस्त्यावर दिसले तर त्यांच्यांकडे बघून थुंकायला हवं. औरंगाबाद शहराचं नामकरण होताना शरद पवार काय तोंडात लाडू घेऊन बसले होते का? असा सवालही जलील यांनी विचारला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Proposal approval of renaming aurangabad as sambhajinagar mim imtiyaz jaleel on sharad pawar rmm
First published on: 30-06-2022 at 00:53 IST