Raj Thackeray : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषा सक्ती आणि मराठी विरुद्ध अमराठी या मुद्यांवरून चांगलाच वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून मनसे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप देखील रंगल्याचं पाहायला मिळालं. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत मुंबईत एक मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यात देखील राज ठाकरे यांनी मराठी विरुद्ध अमराठी या मुद्यावरून गंभीर इशारा दिला होता.

त्यानंतर शुक्रवारी (१९ जुलै) राज ठाकरे यांची ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलतानाही राज ठाकरे हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आणि मराठी विरुद्ध अमराठी या मुद्यांवरून चांगलेच आक्रमक झाले होते. ‘मराठी व्यापारी नाहीयेत का? महाराष्ट्रात राहताय, मराठी शिका, नीट व्यापार करा. मस्ती दाखवलीत तर दणका बसणार म्हणजे बसणार”, असा इशारा राज ठाकरे यांनी परप्रातियांना दिला. मात्र, राज ठाकरे यांनी भाषा वादावरून केलेल्या विधानामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज ठाकरे यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या याचिकेत राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. राज ठाकरे यांनी हिंदी भाषिक लोकांविरुद्ध हिंसाचार भडकवण्याचा आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

दरम्यान, वकील घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केल्याची माहिती सांगण्यात आली आहे. दाखल याचिकेत महाराष्ट्रात भाषा वादावरून तणाव वाढवण्यात कथित सहभागाबाबत राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. भाषेच्या मुद्द्यांवरून मनसे कार्यकर्त्यांनी काही परप्रातियांना मारहाण केल्याची घटना घडली होती. विशेषतः मराठी न बोलणाऱ्यांना लक्ष्य केल्याच्या घटना घडल्यानंतर हे कायदेशीर पाऊल उचलण्यात आलं आहे.

राज ठाकरेंबाबत काही दिवसांपूर्वी पोलीस महासंचालकांकडेही तक्रार

राज ठाकरे यांच्याविरोधात पोलीस महासंचालकाकडे तीन वकिलांनी काही दिवसांपूर्वी तक्रार केली होती. या तक्रारीत राज ठाकरे यांचे काही विधाने सामाजिक अशांततेला प्रोत्साहन देणारे असल्याचं म्हटलं होतं. राज ठाकरे यांनी भाषणात केलेल्या परप्रांतीयांबाबतच्या विधानामुळे राज्यातील सामाजिक सलोखा आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.