Pune Shivshahi Bus Rape Case Update : पुण्यातील वर्दळीच्या स्वारगेट बस स्थानकात उभ्या असणाऱ्या एका पडीक शिवशाही बसमध्ये बलात्काराच्या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. बुधवारी पहाटे ही घटना घडल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळातूनही चिंता व संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याची उद्विग्नता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी बसस्थानकात केलेल्या आंदोलनानंतर खुद्द उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या आंदोलनाचं कौतुक केलं आहे. खुद्द वसंत मोरेंनी फेसबुक पेजवर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“कोण म्हणतं मातोश्रीवर कामाची दखल घेतली जात नाही”

वसंत मोरेंनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंच्या झालेल्या संवादाबाबत माहिती दिली आहे. “कोण म्हणतं मातोश्रीवर कामाची दखल घेतली जात नाही? आंदोलनानंतर अगदी काही तासांतच पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत या दोघांचीही मला पाठीवर थाप मिळाली. आंदोलनात सहभागी सर्व शिवसैनिकांचे, महिला रणरागिणींचे अभिनंदन केले आणि जिथे अन्याय दिसेल आणि विशेषत: महिला भगिनीवर अन्याय होईल तिथे असेच पेटून उठा असा आशीर्वादही दिला”, असं वसंत मोरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरेंनी या फोनकॉलमध्ये पुण्यातील बलात्कार घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. “हे सगळं प्रकरण बोलण्याच्या पलीकडे गेलं आहे. आपण लढतोय. मी सगळ्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय.. जीव जळतो हे सगळं बघून. महाराष्ट्र कुठे चाललाय. मुंबईतही हेच. मराठीवरही आक्रमण. त्यांना कुणालाही पोलिसांची भीती नाही. पण चांगलं केलंत तुम्ही. सगळ्यांना धन्यवाद द्या आणि असेच जागते राहा”, असं उद्धव ठाकरे या कॉलमध्ये म्हणाले.

काय आहे पुणे बलात्कार प्रकरण?

बुधवारी पहाटे पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या स्वारगेट बसस्थानकात एका पडीक शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. पहाटे पाचच्या सुमारास पुण्याहून फलटणला आपल्या गावी जाण्यासाठी निघालेल्या २६ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीला एका सराईत चोरट्यानं फसवून या बसमध्ये नेलं आणि तिथे तिच्यावर दोन वेळा बलात्कार केल्याची बाब तपासात समोर आली आहे.

या प्रकरणातील आरोपीची ओळख पटली असून दत्तात्रय गाडे असं त्याचं नाव आहे. हा आरोपी फरार झाला असून त्याला पकडून देणाऱ्याला १ लाख रुपयांचं बक्षिस दिलं जाईल, असं पोलिसांनी जाहीर केलं आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी १३ पथकं तैनात केली आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune rape case swargate depo shivshahi bus uddhav thackeray vasant more protest pmw