काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या शेगावमधील सभेत भाजपावर जोरदार हल्ला चढवला. “आज देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपाने द्वेष, भीती, दहशत आणि हिंसेचा प्रसार केला आहे,” असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. तसेच द्वेषाने या देशाचा कधीच फायदा होणार नाही, असं मत व्यक्त केलं. ते शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) शेगावमधील भारत जोडो यात्रेच्या सभेत बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधी म्हणाले, “विरोधक विचारत आहेत की भारत जोडो यात्रेची गरज काय? आज देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपाने द्वेष, भीती, दहशत आणि हिंसेचा प्रसार केलाय. तुम्ही जिथं पाहाल तिथं तुम्हाला द्वेष, भीती आणि हिंसा दिसेल. याविरोधासाठीच भारत जोडो यात्रेची गरज आहे. या यात्रेचा उद्देश मन की बात करण्याचा नाही, तर जनतेचा आवाज ऐकण्याचा, त्यांचं दुःख समजून घेणं हा आहे.”

“राज्यात मागील सहा महिन्यात अनेक शेतकऱ्यांची आत्महत्या”

“द्वेषाने या देशाचा कधीच फायदा होणार नाही. विरोधक विचारतील भीती कशाची? जर ते या रस्त्यांवर फिरले असते तर पाच मिनिटात त्यांना ही गोष्ट समजली असती. या राज्यात मागील सहा महिन्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. का केली? कोणत्याही शेतकऱ्याशी बोला, ते म्हणतील आम्हाला योग्य दर मिळत नाही. मी हे ऐकून कंटाळलो आहे,” असं राहुल गांधींनी सांगितलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “तुम्हाला बॉम्बने…” राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी, मिठाईच्या दुकानात मिळालं पत्र

राहुल गांधी पुढे म्हणाले, “मी दुसरा प्रश्न विचारतो, तर ते म्हणतात विम्याचे पैसे भरले, मात्र नुकसान झाल्यानंतर एक रुपयाही मिळाला नाही. यानंतर ते शेतकरी प्रश्न विचारतात की, शेतकरी आत्महत्या करतो कारण ५० हजार एक लाखाचं कर्ज असतं. त्यानंतर हजारो शेतकरी आत्महत्या करतात.”

“शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, पण उद्योगपतींचं हजारो कोटींचं कर्ज माफ कसं?”

“शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जात नाही, मात्र उद्योगपतींचं हजारो कोटी रुपयांचं कर्ज कसं माफ होतं?” असा सवाल राहुल गांधींनी विचारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi criticize bjp for hatred in bharat jodo yatra shegaon rally maharashtra pbs