अलिबाग: रायगड पोलीस दलातील ४२२ रिक्त पदांसाठी ऐन पावसाळ्यात पोलीस भरती होणार आहे. पावसाच्या कालावधीत ३१ हजार ६३ जणांची शारीरिक चाचणी घेण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर असणार आहे. याच वर्षी जानेवारी महिन्यात रायगड पोलीस दलातील २१८ जागांसाठी पोलीस भरती प्रक्रीया पार पडली होती. आता ४२२ जागांसाठी भरती प्रक्रीया पार पडणार आहे. यात ३९१ पोलीस शिपाई, ९ बॅन्ड्समन पोलीस शिपाई आणि ३१ चालक पोलीस शिपाई पोलीस पदांचा समावेश आहे.
बँण्ड्समन पोलिसांच्या ९ जागांसाठी १ हजार ३८३ पुरूष तर ३९० महिला उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ३९१ पोलीस शिपाई पदासाठी २३ हजार ९७३ पुरुष तर ४ हजार ८६० महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर ३१ चालक पोलीस शिपाई पदासाठी २ हजार ०९६ पुरुष तर १३४ महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. २१ जून पासून ३१ हजार ०६३ उमेदवारांच्या शारीरिक चाचणीला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
हेही वाचा : “नवनीत राणांच्या पराभवासाठी…”, रवी राणांचा गंभीर आरोप; म्हणाले, “बच्चू कडू यांना मातोश्रीवरून…”
पावसाचे दिवस असल्याने यंदा ही भरती प्रक्रीया अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात घेतली जाणार नाही. त्या ऐवजी नेऊली येथील जिल्हा क्रीडा संकुलात कागदपत्र पडताळणी, शारिरीक मोजमाप, १०० मीटर धावणे आणि गोळाफेक चाचणी होणार आहे. तर ८०० आणि १६०० मीटर धावणे चाचणी आरसीएफ कॉलनी कुरूळ येथे पार पडणार आहे. दररोज ८०० ते १००० मुलांना चाचणीसाठी बोलवले जाणार आहे. त्यामुळे ३१ हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी पूर्ण होण्यासाठी साधारणपणे एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
पावसाचे दिवस असल्याने या शारीरिक चाचणी प्रक्रीयेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. अशावेळी उमेदवारांना चाचणीसाठी पुढील तारीख देण्याचे नियोजन ठेवण्यात आले आहे. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात कितीतरी जास्त पाऊस पडतो. अशावेळी पावसात उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या घेणे हे यंत्रणेसाठी चांगलेच आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : “४ जून रोजी अमोल कीर्तिकर जिंकले होते, यापुढची लढाई आम्ही..”, आदित्य ठाकरेंची गर्जना
राज्यात सगळीकडे एकाच वेळी पोलीस भरतीची प्रक्रीया होत आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातही पोलीस प्रशासनाने भरती प्रक्रिया निपक्षपातीपणे पार पडावी यासाठी नियोजन केले आहे. कोणत्याही गैरप्रकाराला या प्रक्रियेत थारा दिला जाणार नाही. पावसामुळे एखाद दिवशी शारिरीक चाचणी झाली नाही तर त्या दिवशीच्या उमेदवारांना सोयीस्कर दिवशी पुन्हा बोलविले जाणार आहे.
सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक रायगड.
भरतीप्रक्रीये दरम्यान कोणत्याही व्यक्तीकडून ओळखीचे, अमिष दाखवून पैशाची मागणी केली गेल्यास, उमेदवारांनी थेट पोलीस अधिक्षक कार्यालयात ०२१४१-२२८४७३ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि तक्रार नोदवावी. दरम्यान लांबून भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी राहण्याच्या व्यवस्थेचे नियोजन आम्ही करत आहोत.
अतुल झेंडे, अप्पर पोलीस अधिक्षक रायगड
© The Indian Express (P) Ltd