सांगली : केवळ राजकीय नेत्यांची वेळ मिळत नसल्याने वर्षापासून उद्घाटनाअभावी बंद असलेला सांगली-पलूस मार्गावरील वसगडे रेल्वे उड्डाणपूल सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला झाला असला, तरी उद्घाटनाचा श्रेयवाद चांगलाच रंगला आहे. मात्र, पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने नांद्रे, वसगडेसह पलूसला जाणाऱ्या वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
वसगडे (ता. पलूस) येथे रेल्वेने वाहतुकीसाठी उड्डाणपूल उभा केला आहे. पुलाचे काम पूर्ण होऊन एक वर्षाचा कालावधी झाला. तरीही वाहतुकीसाठी अडथळे लावून बंद ठेवण्यात आला होता. नागरी कृती समितीने याबाबत वेळोवेळी रेल्वे विभागाशी संपर्क साधून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली होती. मात्र, या मागणीची दखल घेतली नाही. तथापि, काही दिवसांपूर्वी आंदोलन करून हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असा इशारा देताच रेल्वे विभागाने केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आभासी पद्धतीने नवरात्रीमध्ये उद्घाटन करण्यात येईल, असे सांगितले. प्रत्यक्षात उद्घाटन झालेच नाही.
सोमवारी काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन केले जाणार असल्याचे निश्चित होताच, नांद्रे व परिसरातील गावकऱ्यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्याशी चर्चा करून वाहतुकीस निर्माण करण्यात आलेले अडथळे जेसीबीच्या मदतीने दूर केले आणि पूल वाहतुकीसाठी खुला केला.
दरम्यान, पूल खुला झाल्यानंतर खासदार पाटील व आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी कार्यकर्त्यांसह श्रीफळ वाढवून रेल्वे पुलाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. पुलाचे काम सुरू असताना तयार करण्यात आलेला पर्यायी वाहतूक मार्ग अत्यंत अडचणीचा आणि चिखलयुक्त होता. त्याचा त्रास वाहनधारकांना होत होता. पाऊस पडल्यानंतर या पर्यायी मार्गाने वाहन चालविणे जिकिरीचेच नव्हे, तर अपघाताला आमंत्रण देणारे ठरत होते. नागरी कृती समितीचे सतीश साखळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी वारंवार या पुलावरून वाहतूक सुरू करण्याची मागणी रेल्वे विभागाकडे केली होती. तीन महिन्यांपूर्वी आंदोलन करून वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र, यानंतर २४ तासांत रेल्वे विभागाने ती बंद केली होती. आता मात्र या पुलाच्या उद्घाटनावरून श्रेयवाद चांगलाच रंगल्याचे पाहण्यास मिळाले.
