पाऊस, गारपिटीचा मारा; मराठवाडा, नंदुरबार, वाशिममध्ये पिकांना फटका, परभणीत वीज कोसळून पाच मृत्युमुखी

मराठवाडय़ाचा काही भाग, विदर्भातील वाशिम आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याला शुक्रवारी गारपीट आणि वादळी पावसाने झोडपले.

mh hailstorm
पाऊस, गारपिटीचा मारा

छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, वाशिम : मराठवाडय़ाचा काही भाग, विदर्भातील वाशिम आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याला शुक्रवारी गारपीट आणि वादळी पावसाने झोडपले. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पीकांची मोठय़ा प्रमाणावर हानी झाली. तसेच परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.  

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

शुक्रवारी बाळासाहेब बाबुराव फड (७५), परसराम गंगाराम फड (४०) या उखळी (ता. गंगाखेड) येथील दोघांचा वीज कोसळून मृत्यू झाला, तर राहीबाई बाबुराव फड (७५), सतीश सखाराम नरवाडे (२९), राजेभाऊ किशन नरवाडे (३५) हे तिघेजण जखमी झाले. सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील ओमकार भागवत शिंदे (१५) याचा वीज कोसळून मृत्यू झाला असून द्वारकाबाई भागवत शिंदे (४५) या जखमी झाल्या आहेत. परभणी तालुक्यातील साडेगाव येथील आबाजी केशव नहातकर आणि  उखळी बुद्रुक येथील नीता गणेश सावंत (३५) हे अंगावर वीज कोसळल्याने दगावले.

मराठवाडय़ातील जळकोट, अर्धापूर, मुखेड, मुदखेड, हदगाव येथे गारपीट आणि अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपल्याने चार हजार ९४६ हेक्टरवरील गहू, हरभऱ्यासह फळपिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळीमध्ये २२ मोठी, तर पाच लहान जनावरे जखमी झाले असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारला कळविली आहे. मुखेड तालुक्यातील पाच गावांमध्ये शुक्रवारी सायंकाळी गारांचा पाऊस झाला. काढणीच्या काळात पडलेल्या पावसाने हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यात मुदखेड परिसरातील भराडी या गावात सर्वाधिक गारपीट झाल्याने तेथील पीक उद्ध्वस्त झाले आहे. आमदार अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने पिकांची हानी झाली. चार दिवसांपासून अवकाळी पाऊस होत असताना आता त्यात गारपिटीची भर पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, मका, पपई, केळी, टरबूज, खरबूज यांसह अन्य पिकांची मोठय़ा प्रमाणावर हानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. दुपारनंतर आष्टे ठाणेपाडा, सिंदबण, केवडीपाडा, छडवेल कोर्डे या भागांत गारांचा पाऊस झाला. शेवाळी- नेत्रंग महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून रस्त्यावर पसरवण्यात आलेल्या मातीच्या भरावावर गारांची चादरच पसरल्याचे चित्र होते. ६ मार्च रोजीही जिल्ह्यात गारपीट झाली होती. त्यावेळी सुमारे चार हजार शेतकऱ्यांच्या दोन हजार हेक्टरहून अधिक पिकांची हानी झाली होती.

मराठवाडय़ात लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यास अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका बसला. सायंकाळी मुखेड व लोहा तालुक्यातही जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. हरभरा, ज्वारी, गहू या पिकांचे मोठे नुकसान झाले असून १ हजार ४२ हेक्टरावरील जिरायत पिके आणि २ हजार ४१४ हेक्टरवरील बागायत पिकांचे नुकसान झाले आहे.

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातही आज पुन्हा अवकाळीने फटका दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतमाल आणि भाजीपाल्याचे भाव पडलेले असताना अवकाळीने दिलेल्या फटक्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

शेतकऱ्यांचा घास हिरावला..

  • मराठवाडय़ात चार हजार ९४६ हेक्टरवरील काढणीला आलेल्या गहू, हरभऱ्यासह फळपिकांचे मोठे नुकसान
  • फळबागा, हळद पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर.
  • गारपिटीने चिकू, आंबा, संत्रा बागांचे मोठे नुकसान. मोसंबी बागा अक्षरश: रिकाम्या झाल्याचे चित्र. 
  • नंदुरबारमध्ये हरभरा, ज्वारी, मका, पपई, केळी, खरबूज पिके उद्ध्वस्त.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 00:02 IST
Next Story
शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपावर नाराजी; सोलापुरात असंघटित, कष्टकरी वर्गाचा संपाला विरोध
Exit mobile version