लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : मुंबईपासून पालघरपर्यंत परप्रांतीयांचा प्रभाव राहील असे मतदारसंघ तयार केले जात आहेत. यात मराठी माणसाला हटविले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. पुढे हा भाग गुजरातला जोडण्याचा डाव असल्याचा दावा त्यांनी मिरा रोड येथील सभेत केला. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राज यांनी जोरदार टीका केली.

मराठी विजयी मेळावा आणि मिरा भाईंदर येथील मोर्चानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांची शुक्रवारी मिरा-भाईंदर येथे जाहीर सभा पार पडली. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हिंदी भाषेची सक्ती करून मुंबईवर नियंत्रण मिळवण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे. यामागे देवेंद्र फडणवीस खटपट करत असल्याची टीका त्यांनी केली. मात्र कोणत्याही परिस्थितीत हिंदीची सक्ती स्वीकारली जाणार नाही. राज्य सरकारने हिंदी सक्तीचा प्रयत्न करून पाहावा, केवळ दुकाने नाही तर शाळाही बंद पाडू असा इशारा त्यांनी दिला.

मराठी माणूस हा महाराष्ट्राचा मालक आहे. माज घेऊन जर कोणी अंगावर आला तर त्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही हे महाराजांचे हिंदवी राज्य आहे. आम्ही कुणाचे गुलाम नाहीत. या प्रांतावर अधिकार असेल तो मराठी माणसाचा आहे असे त्यांनी ठणकावले.

मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरही दुर्लक्ष

केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी घेतला आहे. तरी आजतागायत त्यासाठी एक रुपयाही निधी दिला नाही.चित्रपटसृष्टी वगळता, हिंदी भाषेने कोणाचेही भले केलेले नाही. तरीही सरकार हिंदीला मोठे करण्याचा प्रयत्न करत आहे. एकट्या हिंदी भाषेमुळे अडीचशेहून अधिक मातृभाषांचे नुकसान केले आहे. मात्र, महाराष्ट्रात हिंदीचे हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही असेही राज ठाकरे यांनी सभेत सांगितले.

निशिकांत दुबेंना प्रत्युत्तर

मराठी – हिंदी भाषा वादावरून भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राज यांनी टीका केली. मुंबईत येऊन दाखवा असे आव्हान त्यांनी दुबे यांना दिले.