महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. महापालिका निवडणुकांपूर्वी दोन्ही पक्षांची युती होईल हे आता जवळपास निश्चित झालं आहे. मागील तीन महिन्यांत आठ ते नऊ भेटीगाठी झाल्या आहेत. पाडव्याच्या दिवशी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहचले होते. आता ठाकरे बंधूंची भाऊबीजही एकत्र पार पडली आहे. आता ठाकरे बंधुच्या युतीची औपचारिक घोषणा कधी होणार याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे, आता ही घोषणा कधी होणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. राज ठाकरेंची सख्खी बहीण जयवंती देशपांडे यांच्या घरी भाऊबीज पार पडली. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि दोन्ही भावांची कुटुंबं या कार्यक्रमासाठी उपस्थित होती.
जयवंती देशपांडे यांच्या घरी भाऊबीज
जयवंती देशपांडे या राज ठाकरेंची सख्खी बहीण आहेत. उद्धव ठाकरे हे त्यांचे चुलत भाऊ आहेत. आज भाऊबीजेच्या निमित्ताने राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंब जयवंती देशपांडेंच्या घरी होतं. भाऊबीज झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर परतले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भाऊबीजेच्या निमित्ताने झालेली ही नववी भेट आहे.
ठाकरे बंधूंच्या भेटीवर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत, विरोधकांकडून या भेटीवर टीका केली जात आहे. तर, काही जणांकडून दोन बंधू एकत्र येत असतील तर हा चागंली गोष्ट असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मुंबई महापालिका भाजपा महायुतीच जिंकेल असा विश्वास देखील विरोधकांकडून व्यक्त होत आहे.
आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही एकत्र
आदित्य आणि तेजस ठाकरे हेही ठाकरे कुटुंबातील भाऊबीज स्नेह भोजन कार्यक्रमानिमित्त एकत्र आले आहेत. त्यामुळे, गेल्या चार महिन्यातील ही ठाकरे बंधूची आजची नववी भेट आहे. काही दिवसांपूर्वी दीपावली दीपोत्सव निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, यांसह ठाकरे कुटुंब एकत्र आले होते. त्यावेळी, दोन्ही कुटुंबातील स्नेहबंध महाराष्ट्राने पाहिले. त्यामुळेच, आता ठाकरे बंधुच्या युतीची औपचारिक घोषणा कधी होणार याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे.
५ जुलैला ठाकरे बंधू पहिल्यांदा एकत्र
५ जुलै – २०२५ ला मराठी भाषेच्या मेळाव्यात हे दोन्ही बंधू एकाच मंचावर आले. २७ जुलै- २०२५ – मराठी भाषा मेळाव्यानंतर जवळीक वाढली आणि थेट राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर या भेटीगाठी वाढल्या आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा अद्याप बाकी
ठाकरे हा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक ब्रांड आहे. दरम्यान ५ जुलैला एकत्र आल्यापासूनच दोन्ही भावांची युती होईल अशी चर्चा आहे. संजय राऊत यांनीही दोन्ही भाऊ युती करतील अशं सांगितलं आहे. मात्र दोन्ही भावांनी अद्याप युतीची घोषणा केलेली नाही.
