"मी काल पवार साहेबांशीही बोललो, ते म्हणाले...", 'वेडात मराठे वीर दौडले सात'बाबत राज ठाकरेंचं वक्तव्य | Raj Thackeray comment on Vedant Marathe Veer Daudale Saat move in Kudal | Loksatta

X

“मी काल पवार साहेबांशीही बोललो, ते म्हणाले…”, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’बाबत राज ठाकरेंचं वक्तव्य

राज ठाकरेंनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’बाबत ‘मी काल पवार साहेबांशीही बोललो’, असं वक्तव्य केलं आहे.

“मी काल पवार साहेबांशीही बोललो, ते म्हणाले…”, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’बाबत राज ठाकरेंचं वक्तव्य
मनसे प्रमुख राज ठाकरे (फोटो सौजन्य – ट्विटर)

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातील ऐतिहासिक तथ्यांबाबत झालेल्या वादावर भाष्य केलं आहे. “याबाबत मी इतिहासकार जयसिंगराव पवार यांच्याशी बोललो. त्यांनी गजानन मेहंदळे म्हणतात ते खरं असल्याचं सांगितलं,” अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली. ते सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी (१ डिसेंबर) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “जातीपलिकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं आहे. सध्या जातीतून इतिहास पाहण्याचं पेव फुटलं आहे. ठराविक मुठभर लोकच असं करत आहेत. त्यात त्यांचा राजकीय स्वार्थ आहे.”

“इतिहासाबद्दल कुतुहल वाटतं तेव्हा मी तज्ज्ञ मंडळींशी बोलतो”

“‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या कार्यक्रमात मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होतो. त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सहा जणांची नावं टाकली. मग कोणीतरी बोललं ही सहा नावं नाहीत, तर ही सहा नावं आहेत. गंमत बघा, मला जेव्हा इतिहासाबद्दल कुतुहल वाटतं तेव्हा मी तज्ज्ञ मंडळींशी बोलतो. आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.

“मी यावर काल पवार साहेबांशीही बोललो”

राज ठाकरे पुढे म्हणाले, “मध्यंतरी मी गजानन मेहंदळे यांना भेटलो. मी त्यांना विचारले की, वेडात मराठे वीर दौडले सातबाबत कोणी ही सहा नावं सांगत आहे, तर कोणी ती नावं सांगत आहेत. तुमचं म्हणणं काय? मी यावर काल पवार साहेबांशीही बोललो. ते मला म्हणाले की, गजाननराव बरोबर बोलत आहेत.”

हेही वाचा : “…तोपर्यंत भाजपाचा कुठलाही नेता उभ्या महाराष्ट्रात फिरू शकणार नाही”, शिवसेनेचा जाहीर इशारा

“आतापर्यंत आपण जी नावं ऐकली ती सर्व काल्पनिक नावं आहेत”

“गजाननराव इतिहासाचे दाखले आणि संदर्भ यांचे ते अभ्यासक आहेत. मी मेहंदळे सरांना हे काय आहे असं विचारलं. ते शांत बसले आणि म्हणाले की, जगातल्या कोणत्याही इतिहासाच्या पानावर ते सात होते की आठ होते की दहा होते हे कोठेही लिहिलेलं नाही. प्रतापराव गुजर यांच्याबरोबर कोणत्या नावाचे कोण लोक होते याचा जगाच्या इतिहासात काहीही दाखला नाही. आतापर्यंत आपण जी नावं ऐकली ती सर्व काल्पनिक नावं आहेत,” असं राज ठाकरेंनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 13:07 IST
Next Story
Maharashtra Breaking News : मंगलप्रभात लोढा यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला- शिवेंद्रसिंहराजे भोसले