Raj-Uddhav Thackeray Alliance : मराठी भाषेसंदर्भात मुंबई येथे आयोजित मेळाव्यात शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीत हे दोन नेते एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या. दरम्यान राज ठाकरे यांनी इगतपुरी येथे झालेल्या त्यांच्या पक्षाच्या शिबिरात मुंबईत झालेला मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता, असे विधान केलं होते. यामुळे पुन्हा एकदा दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यासंबंधी काही माध्यमांनी वृत्त देखील दिले. दरम्यान राज ठाकरे यांनी आज सोशल मीडियावर पोस्ट करत “मी न बोललेले शब्द माझ्या तोंडी घातले”, असे म्हणत यासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे.

राज ठाकरे यांचं स्पष्टीकरण

राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टच्या सुरूवातीलाच ते नेमकं काय म्हणाले होते, याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. “१४ आणि १५ जुलै २०२५ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्या दरम्यान मला ५ जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता. त्यावर मग युतीचं काय? असं विचारण्यात आलं, त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता? असं उत्तर दिलं,” असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

अनौपचारिक गप्पांमध्ये बोलल्या विधानावरून बातम्या चालवल्याबद्दल राज ठाकरे यांनी माध्यमांवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच जे बोललं नाहीू ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसते हे भान राखण्याचा सल्ला त्यांनी माध्यमांना दिला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, “त्यानंतर काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रानी आणि निवडक माध्यमांनी, मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल. ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे? अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात, आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं हे भान पण आता गेलं आहे का? कोणाच्यातरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे, हे आमच्या लक्षात येत नाहीये असं समजू नका. तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कोणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का? आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या, हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा? आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की टाईम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्राने देखील शहानिशा न करता अशी बातमी टाकावी? सोशल मिडीयावर ज्याप्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा!”

“नशिबाने आजही असे अनेक प्रामाणिक संपादक आणि पत्रकार आहेत ज्यांना मी काय म्हणतोय हे कळत असेल! पत्रकारितेचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध हा १९८४ पासून आहे आणि आमच्या घरातच साप्ताहिकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं जन्माला आली आहेत. माझाही व्यंगचित्रंकार म्हणून मार्मिक, लोकप्रभा, आवाज, लोकसत्ता ते सामना असा प्रवास झाला आहे, पत्रकारिता ही मी खुप जवळून अनुभवली आहे. त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पत्रकारिता काय आणि कशी असते याची मला पूर्णपणे कल्पना आहे! त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना माझी विनंती आहे की हे असले प्रकार करू नका,” अशी विनंती देखील राज ठाकरे यांनी केली आहे.

युतीबद्दल बोलयचे असेल तर…

“मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन!” असेही राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये स्पष्ट केले.