नांदेड :‘भाजपामध्ये मला अजून बरेच काही शिकायचे आहे.’ असे गेल्या वर्षभरात वारंवार सांगणार्‍या खा.अशोक चव्हाण यांना या पक्षाचे पूर्वाश्रमीचे नेते आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी येथे एका कार्यक्रमात जनसंघाच्या संघर्षमय वाटचालीचे प्रसंग ऐकवतानाच आम्ही पक्षनिष्ठा कधी सोडली नाही, याकडे त्यांचे लक्ष वेधले. बागडे यांचे हे भाषण चव्हाणांसाठी एक बौद्धिक वर्ग ठरले!

शिशू अवस्थेपासून काँग्रेसी सत्तेच्या उबदार वातावरणात वाढलेले आणि वयाच्या पन्नाशीत याच पक्षातर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे अशोक चव्हाण आता भाजपाचे राज्यसभा सदस्य असून पिताश्री शंकरराव चव्हाण यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त यंदा त्यांनी जनसंघ आणि भाजपात दीर्घकाळ कार्य केलेल्या बागडे यांना आमंत्रित करून अशाप्रसंगी काँग्रेसजनांना एकत्र आणण्याची गेल्या २०/२२ वर्षांची परंपरा खंडित केली. त्यांच्या या निमंत्रणाचे औचित्य साधत बागडे यांनी नांदेडमधील दोन्हीही कार्यक्रमांमध्ये शंकररावांची स्तुती करताना कोणतीही कसर ठेवली नाही.

बागडे यांच्या नांदेड दौर्‍याचे निमित्त साधत संघ-भाजपा परिवारातील मंडळींच्या स्थानिक शिक्षण संस्थेने नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात त्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. खा.अशोक चव्हाण हेही तेथे उपस्थित होते. त्यांच्या भाजपा प्रवेशास आता दीड वर्षे उलटली असली, तरी भाजपापूर्वीच्या जनसंघाचा इतिहास, या पक्षाच्या संस्थापकांचा संघर्ष, त्यांचा त्याग इत्यादी बाबींचे आकलन चव्हाण यांना झाले आहे का, ते समोर आलेले नाही; पण बागडे यांनी वरील कार्यक्रमात केलेले भाषण त्यांच्यासाठी प्रबोधनवर्ग ठरले.

बागडे यांचा नांदेडशी १९६५पासूनचा संबंध. विवेक साप्ताहिकाचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते या नात्याने वेळोवेळी केलेल्या दौर्‍यांतून त्यांचा जनसंघाच्या नांदेडमधील तेव्हाच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी जवळून संबंध आला. त्यांतील जवळपास सर्वांची नावे घेऊन बागडे यांनी त्यांच्या पक्ष आणि विचारनिष्ठेचा खा.चव्हाण यांच्या उपस्थितीत गौरवपर उल्लेख केला. भाजपाला राज्यात सर्वप्रथम नगर परिषदेची सत्ता मिळवून देणार्‍या राम चौधरी यांचेही नाव बागडे यांनी घेतले. पण आता भाजपात अवतरलेल्या ‘अशोक पर्वा’त चौधरी अडगळीत गेले आहेत.

वरील शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांच्या गौरवाचा कार्यक्रम असतानाही राज्यपाल बागडे यांनी मुक्तपणे राजकीय भाषण केले. भाजपा आज केंद्रात आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांत सत्तेवर आहे. हे अच्छे दिन येण्याआधी मागील शतकाच्या उत्तरार्धात जनसंघाची जडणघडण कशी झाली, पूर्वसुरींनी त्यासाठी काय काय केले, लोकांची साथ नसताना तेव्हाचे नेते कधी पायी तर कधी सायकलवरून कसे फिरले इत्यादी अनेक जुन्या बाबी बागडे यांनी अशोक चव्हाण यांच्यासमोर कथन केल्या.

या कार्यक्रमानंतर खा.अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित कंपनीच्या वर्तमानपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये हरिभाऊ बागडे मुख्य पाहुणे होते. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना चव्हाण यांनी सकाळच्या सत्रातील कार्यक्रमाचा संदर्भ दिला नाही. पण मला भाजपात अजून बरेच काही शिकायचे असल्याचे प्रांजळपणे सांगितले.

जनसंघाच्या त्यावेळच्या प्रचारकांना विरोधक टोमणे मारायचे, हिणवायचे. तरीही अनेक अडचणींशी सामना करत ही माणसं आपल्या विचारांवर ठाम राहिली. तत्त्वाशी कुठलीही तडजोड न करता तसेच स्वतःचा व परिवाराचा विचार न करता आपले जीवन त्यांनी राष्ट्राला समर्पित केले. त्यांच्या कष्टाचे, परिश्रमाचे आणि चिकाटीचे फळ आपल्याला आज मिळालेले आहे.- हरिभाऊ बागडे,राज्यपाल, राजस्थान बागडे गुरूजी आणि भाजपा शिकणारे अशोक चव्हाण…