सांगली : मूठभर लोकांचे कोटकल्याण करण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला असून याला विरोध करण्यासाठी १२ मार्च रोजी मुंबईत आंदोलन करण्यात येणार असल्याचे माजी खा. राजू शेट्टी यांनी रविवारी सांगलीत पत्रकार बैठकीत सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शक्तीपीठ महामार्गासाठी ८६ हजाराचा खर्च अपेक्षित असला तरी अंतिम पातळीवर याचा खर्च दीड लाख कोटीवर जाणार आहे. नागपूर-रत्नागिरी हा समांतर राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध असताना शक्तीपीठाचा आग्रह हा केवळ पैसे मिळवण्यासाठी धरला जात असून यामुळे  १२  जिल्ह्यातील शेकडो शेतकरी उध्वस्त होणार आहेत.

प्रस्तावित महामार्गामुळे महापूराचा धोका अधिक गडद होणार असून याचा सर्वाधिक फटका सांगली, कोल्हापूर आणि कराड या शहरांना बसणार आहे. कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा आणि येरळा नदीवर पूल उभारणी केल्या मुळे महापूराचे पाणी निचरा होण्यासाठी अधिक कालावधी लागणार असून यामुळे उर्वरित शेती व गावेही उध्दवस्त होण्याची भीती आहे. मिळणारी भरपाई ही अल्प असून शासकीय मुल्यांकनापेक्षा ही बाजारभाव अधिक असल्याने शेतकरी देशोधडीला लागणार आहेत.

कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्ग समर्थनासाठी आयोजित करण्यात आलेला मेळावा हा बाधित शेतकर्‍यांचा नव्हताच असा दावा करून शेट्टी म्हणाले, जे हजर होते त्यांनी आपल्या शेतीचे गटनंबर जाहीर करावेत. केवळ राजकारण करून शेती उध्वस्त करून मुठभर लोकांचे उखळ पांढरे करण्यासाठीच शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

अलमट्टी धरणाची  उंची वाढ करण्यास आमचा विरोध कायम असून याबाबत राज्य सरकार अद्याप गंभीर नसल्याचे त्यांनी सांगितले. अद्याप कर्नाटकच्या भूमिकेला हरकतही राज्य शासनाने  नोंदवली नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा, कॉ. उमेश देशमुख आदींसह बाधित गावातील शेतकरी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shetty statement regarding shakti peeth amy