कर्जत : लोकशाही म्हणजे केवळ शासनपद्धती नसून ती एक जीवनमूल्य आहे — हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भारत विद्यालय, मिरजगाव येथील नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी आज विधानभवन, मुंबई येथे अविस्मरणीय शैक्षणिक भेट दिली.
ही भेट महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रेरणेतून आणि विशेष पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना विधानसभेचे तसेच विधानपरिषदेचे कार्य, लोकशाही निर्णयप्रक्रिया, जनप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या आणि राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वांची माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी सभापती प्रा. राम शिंदे यांची विशेष भेट घेतली. प्रा. शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत विधायक कार्यपद्धती, शासनाचे कार्य आणि विविध जनकल्याणकारी योजना याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना “लोकशाही ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे” असा प्रेरणादायी संदेश देत त्यांनी तरुण पिढीला सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित केले.
विद्यार्थ्यांनी मनोगतातून भावना व्यक्त करताना सांगितले की, “सभापती प्रा. राम शिंदे हे आमच्या परिसरातील अभिमान आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे आम्हाला विधानभवनात पाऊल ठेवण्याची आणि लोकशाहीची खरी ओळख अनुभवण्याची संधी मिळाली. ही भेट आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरली.”
मुख्याध्यापक किशोर खुरांगे, शिक्षक राजेंद्र नवले, कल्याण गवारे, श्रीमती निशा गुंड यांच्यासह विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी नवले, रुद्राक्ष लाडाने, साई खुरांगे, संतोषी चव्हाण यांनी या भेटीमुळे आपल्या मनात लोकशाहीविषयी अधिक आदर, शासनव्यवस्थेबद्दल जागरूकता आणि सार्वजनिक कार्यात सहभागाची प्रेरणा निर्माण झाल्याचे सांगितले.
सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारामुळे मिरजगावच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लोकशाहीच्या मंदिराची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली आहे. ही शैक्षणिक भेट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरली, असा सूर शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.
