Ramdas Kadam Names Sharad Pawar: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केलेल्या दाव्याची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर तसाच ठेवण्यात आला होता, असा दावा रामदास कदम यांनी केला आहे. त्याचबरोबर निधनानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसेही घेण्यात आले होते, असंही ते म्हणाले. या विधानावरून वाद निर्माण झाला असताना खुद्द रामदास कदम यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. हे स्पष्टीकरण देताना त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे.
शरद पवारांबाबत काय म्हणाले रामदास कदम?
दसरा मेळाव्यातील आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांसमोर शरद पवारांचा उल्लेख केला आहे. “मी जे बोललो त्या वक्तव्यावर ठाम आहे. बदलणार नाही. मला प्रसिद्धी नको. ही अतिशय गंभीर बाब आहे. शरद पवार तेव्हा आले होते. पण तेव्हा मातोश्रीवर त्यांनाही वर पाठवलं नाही. कुणालाही वर पाठवलं नाही. तेव्हा शरद पवार म्हणाले होते, ‘अरे मिलींद, उद्धव त्यांच्या मृतदेहाला का त्रास देतोय?’ मला आठवतंय. मी त्यावेळी मातोश्रीवरच होतो”, असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे कपटी आहेत – रामदास कदम
रामदास कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर टीका केली. “बाळासाहेब ठाकरे तर माझं दैवत आहे. पण रामदास कदमसारख्या ज्येष्ठ माणसाला हे का बोलावं लागतं? उद्धव ठाकरेंनी हिंमत असेल तर समोर येऊन सांगावं असं घडलं नाही. मग मी त्यांना उत्तर देईन. त्यांची सवय आहे इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वत: चाप ओढायचा. परवा ती शिवसेनेची उपनेता आली होती. तिनं सांगितलं की रामदासभाई मला उद्धव ठाकरेंनी इतकं टॉर्चर केलं की तुम्ही रामदास कदमांवर बोला. ऐकलं नाही म्हणून माझं पद काढून घेतलं असं ती म्हणाली. उद्धव ठाकरे दिसतात तसे नाहीत. ते कपटी आहेत”, अशा शब्दांत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
“होय, बाळासाहेबांच्या मृतदेहाचा छळ झाला”
“दोन दिवस उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुखांच्या मृतदेहाचा छळ केला. हे मी पुन्हा जबाबदारीने बोलतोय. उद्धव ठाकरे आणि माझी एकदा नार्कोटिक्स होऊन जाऊ दे. दूध का दूध आणि पानी का पानी. मी कधीच खोटं बोललो नाही. मी जेव्हा उद्धव ठाकरेंना विचारलं की शिवसेना प्रमुखांच्या पायांचे ठसे घेऊन ठेवा. तेव्हा ते मला म्हणाले की त्यांच्या हातांचे ठसे घेऊन ठेवलेत. मग माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की त्या हातांच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते आम्हाला सांगा. हिंमत असेल, तर उद्धव ठाकरेंनी यावर माझ्याशी थेट बोलावं. मी त्यांना उत्तर देईन. दोन दिवस कुणालाही मातोश्रीत वर पाठवलं जात नव्हतं. शिवसेनाप्रमुखांसारखा माणूस आजारी असतो तेव्हा डॉक्टर मृत्यू झाल्याचं जाहीर करतात. पण तेव्हा मला ते जाहीर करायला सांगितलं”, असं रामदास कदम यावेळी म्हणाले.
“उद्धव ठाकरे, तुम्ही हे पाप केलंय. माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत. मी त्या बोलणार नाही, पण वेळ पडली तर सोडणार नाही. बाळासाहेब ठाकरे तुमच्याबद्दल माझ्याकडे काय काय बोलले ते माझ्याआत आहे. मला ते बोलायला लावू नका. त्यामुळे काल मी जे अनावधानाने बोलून गेलो ती चूक नाही, ते वास्तव आहे. ते घडलंय”, असं सूचक विधानही रामदास कदम यांनी केलं.
मी बोलेन तेव्हा मातोश्रीला हादरे बसतील – रामदास कदम
दरम्यान, यावेळी रामदास कदम यांनी गंभीर इशारा दिला. “उद्धव ठाकरेंनी मला सांगावं रामदासभाई बोला, मी नक्की बोलेन. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. मी जेव्हा जेव्हा तोंड उघडेन, तेव्हा मातोश्रीला हादरे बसतील. माझ्या नादाला लागू नका. मी शिवसेनाप्रमुखांसोबत निष्ठेनं दिवस काढलेत. हजारो वेळा बाळासाहेबांनी माझी पाठ थोपटली आहे. मीडियानं त्या डॉक्टरांना विचारावं. ते सांगतील. सगळा विषय संपेल”, असं रामदास कदम पत्रकार परिषदेत म्हणाले.