उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारवर नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. सरकारी कार्यक्रमात, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांची गैरहजेरी पाहून या चर्चांना जोर आला आहे. परंतु, अजित पवारांची प्रकृती बरी नसल्याचे कारण देत ही चर्चा थांबवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षांमधील नेते करत आहेत. अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चेदरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते रावसाहेब दानवे यांनी अजित पवारांची भेट घेतली. दानवे यांनी अजित पवारांची समजूत काढण्यासाठी ही भेट घेतल्याचा दावा केला जात असतानाच स्वतः खासदार दानवे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवारांच्या भेटीनंतर रावसाहेब दानवे यांनी शालेय शिक्षणमंत्री आणि शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. दोन्ही भेटींबद्दल रावसाहेब दानवे म्हणाले, मी, दिपक केसरकर आणि अजित पवार गेली अनेक वर्षे राजकारणात आहोत. पूर्वी वेगवेगळ्या पक्षांमध्ये होतो. आता महायुतीत एकत्र आलो असून राज्यात काम करत आहोत. त्यामुळे आमच्या भेटीगाठी हे काही नवीन नाही.

रावसाहेब दानवे म्हणाले, काल (५ ऑक्टोबर) मला दीपक केसरकर यांनी फोन केला. माझंही त्यांच्याकडे काम होतं. त्यामुळे मी त्यांना भेटायला आलो. अजित पवार यांच्याकडेही गेलो. मतदारसंघातले काही विषय असतात, ते सोडवण्यासाठी राज्यातल्या मंत्र्यांना भेटावं लागतं. कधी त्यांना केंद्रात काम असतं, जसं माझ्याकडे रेल्वेखातं आहे. एकत्र भेटल्यावर कामांची आणि विचारांची देवाणघेवाण होते. वेगवेगळे प्रश्न मार्गी लागतात. आज दीपक केसरकरांना भेटलो, माझे जे विषय होते ते मार्गी लागले. दादांकडे गेलो तिथे त्यांचे विषय मार्गी लागले. सरकारचे दोन मंत्री भेटणं काही नवीन गोष्ट नाही. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे.

हे ही वाचा >> “राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंकडे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितलेलं; पण…”, प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट, म्हणाले…

दरम्यान, यावेळी रावसाहेब दानवे यांना विचारण्यात आलं की, या भेटीवेळी कोणती राजकीय चर्चा झाली? अजित पवार यांची तब्येत कशी आहे? यावर खासदार दानवे म्हणाले, राजकारणावर चर्चा झाली नाही. अजित पवारांची प्रकृती बरी नाही. मलाही ते जाणवलं की, त्यांची तब्येत बरी नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raosaheb danve answer on is ajit pawar unhappy with government after meeting asc