महाविकास आघाडीने अलीकडेच मुंबईत ‘महामोर्चा’चं आयोजन केलं होतं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चात केलेल्या भाषणात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारबाबत मोठं भाकीत केलं होतं. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असं राऊत म्हणाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राऊतांच्या या विधानाला केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पुढच्या निवडणुकीत स्वत: संजय राऊत कुठे असतील, हे सांगता येणार नाही. न्यायालयाचा निर्णय आला तर संजय राऊतांना पुन्हा तुरुंगात जावं लागेल, असे संकेत रावसाहेब दानवेंनी दिले आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दानवेंनी हे विधान केलं आहे.

हेही वाचा- “मंत्र्याला अक्कल पाहिजे की…”, नागपूर NIT भूखंडप्रकरणी आव्हाडांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर राऊतांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता रावसाहेब दानवे म्हणाले, “हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही की स्वत: संजय राऊत फेब्रुवारी महिना बघणार नाहीत, हे मला माहीत नाही. संजय राऊत पूर्णपणे बेदाग होऊन बाहेर पडले आहेत, असं नाही. कदाचित न्यायालयाचा निर्णय आला तर संजय राऊत पुढच्या निवडणुकीत कुठे असतील? हे सांगता येणार नाही,” असंही दानवे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raosaheb danve on sanjay raut shinde fadnavis government shivsena rmm