“राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार १५-२० आमदार घेऊन भाजपाबरोबर सत्ता स्थापन करणार असल्याचं बोललं जात आहे. यावर काय सांगाल?” असा प्रश्न पत्रकारांनी अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांना विचारला. यावर रवी राणांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं नाव घेत प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी मागील वेळी झालेल्या पहाटेच्या शपथविधीची माहिती १० दिवस अगोदरच दिल्याचंही म्हटलं. ते सोमवारी (१७ एप्रिल) अमरावतीत पत्रकारांशी बोलत होते.

रवी राणा म्हणाले, “अजित पवारांनी जेव्हा पहाटे पहाटे शपथ घेतली, तेव्हाही मी १० दिवस अगोदरच सांगितलं होतं की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा सरकार स्थापन करणार आहे. मात्र, शरद पवारांवरील धर्मसंकटामुळे तिथं अडचण आली. आता अजित पवार यांची ३३ महिने महाविकासआघाडीबरोबर राहून घुसमट झाली आहे. त्यांचा श्वास गुदमरतो आहे.”

“पवार-फडणवीस एकमेकांना सांभाळून घेतात”

“अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील आपआपसातील संबंध चांगले आहेत. ते एकमेकांशी जुळवून घेतात, एकमेकांना सांभाळून घेतात हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वावर अजित पवारांचाही विश्वास आहे,” असा दावा रवी राणा यांनी केला.

“राहिलेलं अर्धवट स्वप्न पूर्ण करतील”

“अजित पवारांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील मविआ सरकारमध्ये मन लावून काम केलं नव्हतं. कारण ते सरकार कामच करत नव्हतं. उद्धव ठाकरेंच्या एकेरी धोरणामुळे अजित पवारांनी पाहिलेलं स्वप्न अर्धवट राहिले. त्यामुळे अजित पवार देवेंद्र फडणवीसांबरोबर जाऊन राहिलेलं अर्धवट स्वप्न पूर्ण करतील, असं माझं भाकीत आहे,” असंही रवी राणांनी नमूद केलं.

“अजित पवार भाजपाबरोबर गेले, तर शरद पवारांचा हिरवा कंदील असणार का?”

“अजित पवार भाजपाबरोबर गेले, तर शरद पवारांचा हिरवा कंदील असणार का?” असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता रवी राणा म्हणाले, “शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे काय संबंध आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. मोदी पवारांचा आदर करतात. शरद पवारही मोदींचा आदर करतात. ८ दिवसांपूर्वीच शरद पवारांनी सांगितलं होतं की, हे मुद्दे महत्त्वाचे नाहीत. यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांचे पाय पकडले. हे महाराष्ट्राने पाहिलं.”

हेही वाचा : “अजित पवार काही आमदार घेऊन बाहेर पडत असतील तर…”, गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केलं मत

“…म्हणून उद्धव ठाकरेंना सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांचे पाय पकडावे लागले”

“शरद पवारांनी एक वक्तव्य केलं तर उद्धव ठाकरेंना मातोश्रीवरून सिल्व्हर ओकवर जावं लागलं. शरद पवारांचे पाय पकडावे लागले. आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांकडे पाहिलं तर त्यांना कुणी पकडून मारलं आहे की काय असं वाटत होतं. अशाप्रकारचे त्यांचे चेहरे झाले होते. त्यांना माहिती आहे की, शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरील हात काढला, तर उद्धव ठाकरेंबरोबर दोन आमदारही राहणार नाहीत,” असा दावा रवी राणा यांनी केला.

“कधीपर्यंत अजित पवार भाजपाबरोबर जाणार?”

“कधीपर्यंत अजित पवार भाजपाबरोबर जाणार?” या प्रश्नावर रवी राणा म्हणाले, “शरद पवारांच्याच परवानगीने अजित पवार भाजपात जाणार आहेत. मोदी-शाहांनी हिरवा कंदील दिल्यानंतर अजित पवार भाजपाबरोबर जातील. त्यांचा हिरवा कंदील कधीही येऊ शकतो. तेव्हा अजित पवार पुन्हा नॉट रिचेबल होतील”