नांदेड – नांदेड जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे ४०० ते ५०० गावे बाधित झालेले आहेत. परंतु, उशीरा शहाणपण सूचलेल्या पालकमंत्र्यांनी काल (दि.२९) नांदेड दौरा करून मोजक्याच गावांना भेटी देवून पाहणी केली. दरम्यान, कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय न घेतल्याने बाधित नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. बाधित गावांचा सरसकट पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी, अन्यथा पालकमंत्री अतुल सावे यांना नांदेड जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही, असा इशारा खा. रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे.
शहर व जिल्हा कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते शनिवारी (दि.३०) बोलत होते. यावेळी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील बेटमोगरेकर, उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, उपाध्यक्ष यशपाल भिंगे, सरचिटणीस सुरेंद्र घोडजकर, महेश देशमुख, डा. श्रावण रॅपनवाड, विठ्ठल पावडे, बालाजी चव्हाण आदी उपस्थित होते.
खा. रवींद्र चव्हाण म्हणाले की, पाण्याचा ओघ ओसरल्यानंतर पालकमंत्री अतुल सावे शुक्रवारी सायंकाळी नांदेडमध्ये आले. काही ठराविक ठिकाणी भेटी देऊन त्यांनी पाहणी केली. दरम्यान, माझ्या गावात जाऊनही मला कुठल्याही प्रकारचे निमंत्रण दिले नाही. या दौऱ्यामध्ये मला दूर ठेवल्याचा आरोप खा. रविंद्र चव्हाण यांनी केला आहे. मी, दोन दिवसांपासून बाधित गावांना भेटी देवून नागरिकांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या समस्या जाणून घेऊन प्रशासनाच्या संपर्कात असल्याचेही खा. रवींद्र चव्हाण यांनी सांगितले आहे.
मनपा प्रशासन जबाबदार
गत तीन वर्षांपासून मनपावर प्रशासक राज आहे. त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने कामे करत असून, नागरिकांच्या समस्यांत वाढ होत आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करणे आवश्यक असताना ती केलेली नसल्याने नांदेड शहरातील बहुतांश भाग हा पाण्याखाली गेलेला आहे. हे नित्याचेच असतानाही मनपा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप खा. रवींद्र चव्हाण यांनी केला आहे.