Pune Jain Boarding House Land Scam Murlidhar Mohol : “काय म्हणता धंगेकर, जमीन चोर निघाला मुरलीधर..! Stay tuned!”, अशी खोचक टिप्पणी करणारी पोस्ट माजी आमदार तथा शिवसेनेचे (शिंदे) नेते रवींद्र धंगेकर यांनी रविवारी (१९ ऑक्टोबर) एक्सवर केली होती. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीनीच्या व्यवहारावरून धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला होता. जैन संघटनांचा रोष, शेतकरी नेते राजू शेट्टींची टीका आणि धंगेकरांच्या या पोस्टनंतर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले.
दरम्यान, या पत्रकार परिषदेतून मोहोळ यांनी योग्य माहिती दिली नसल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे. तसेच त्यांनी आणखी एक पोस्ट करून मुरलीधर मोहोळ यांना चिमटा काढला आहे. धंगेकर म्हणाले, “मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत अर्धा तास बडबड केली. परंतु, एकदाही जैन मंदिर वाचलं पाहिजे असं म्हणाले नाहीत. कारण त्यांना त्यांचा व्यावसायिक भागीदार महत्त्वाचा आहे आणि त्यावरील मलिदा खायचा आहे.”
रवींद्र धंगेकर म्हणाले, “अर्धा तास पत्रकार परिषद घेउन बडबड केली पण गडी एकदा पण म्हणाला नाही की हे जैन मंदिर वाचलं पाहिजे. हा व्यवहार थांबला पाहिजे.”
मोहोळ यांना छुप्या भागीदारीतून मिळणारा मलिदा महत्त्वाचा : धंगेकर
“आज पुणेकर म्हणून दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की आमच्या खासदाराच्या व्यावसायिक भागीदाराने जैन मंदिर बँकेत गहाण ठेवून ७० कोटी रुपये कर्ज घेतलं. मंदिर आणि हॉस्टेलची तीन हजार कोटी रुपयांची मालमत्ता ३०० कोटी रुपयांत खिशात घातली आणि आमचा खासदार ना जैन मंदिराबद्दल काही बोलत ना हा व्यवहार थांबवण्यासाठी काही प्रयत्न करतोय. कारण जैन समुदायाच्या भावनांपेक्षा यांना यांचा व्यावसायिक भागीदार महत्त्वाचा आहे आणि या छुप्या भागीदारीतून मिळणारा मलिदा महत्त्वाचा आहे. STAY TUNED!”
मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा : धंगेकर
रवींद्र धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, तसेच या जमीन घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली आहे.
मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या व्यवहार प्रकरणाचं जे खरेदी खत झालं, ती जमीन पुण्यातील गोखले बिल्डर्सने ते विकत घेतली. मात्र, माझ्यावर असा आरोप झाला की, मी गोखले बिल्डर्सचा भागीदार आहे. मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात घोषित केलं आहे की मी शेती व्यवसाय करतो आणि दोन ठिकाणी बांधकाम व्यवसाय करतो. १५ वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी माझा बांधकाम व्यवसाय चालू आहे. एका राजकारणी माणसाने व्यवसाय करू नये का? गोखले यांच्याबरोबर मी प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेल्या माहितीप्रमाणे दोन एलएलपी संस्था होत्या, या दोन्ही एलएलपीचा मी राजीनामा देऊन २५ नोव्हेंबर २०२४ मध्ये बाहेर पडलो होतो. त्याची कागदपत्र माझ्याकडे आहेत.”