Ravindra Dhangekar vs Muralidhar Mohol on Jain Boarding House : पुणे शहरातील मॉडेल कॉलनी येथील जैन समाजाच्या बोर्डिंगच्या जमीन व्यवहार प्रकरणी भारतीय जनता पार्टीचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव समोर आल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) नेते व माजी आमदार रवींद्र धंगेकर दररोज नवनवे आरोप करत आहेत. दरम्यान, ज्या गोखले बिल्डर्सने सदर जमीन खरेदीचा व्यवहार केला होता त्यांनी जैन ट्र्स्टला ई-मेल पाठवला आहे की ‘आम्ही जमीन खरेदीचा व्यवहार रद्द करत आहोत.’ यावर आता धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रवींद्र धंगेकर यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “त्यांच्या नाटकाचा पहिला अंक संपला आहे. आता दुसरा अंक सुरू होत आहे. पहिल्या अंकात गोखले ट्र्स्टकडून मेल आला आहे. यांच्या नाटकाचा तिसरा अंक येण्याआधीच म्हणजेच दुसऱ्या अंकात सगळं प्रकरण संपेल. ते लोक (मोहोळ व गोखले) तिसरा अंक येऊ देणार नाही अशी मला आशा आहे. कारण तिसरा अंक आला तर त्यांच्या राजकीय जीवनाची चिरफाड होईल. ती चिरफाड होऊ नये यासाठी त्यांनी सावध भूमिका घेतली असेल.”
माजी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, “विशाल गोखले हा माणूस दिलेल्या भाकरीचा आणि सांगितलेल्या कामाचा आहे. १० वर्षांत त्यांची संपत्ती कशी वाढली. मुरलीधर मोहोळ स्थायी समितीचे अध्यक्ष झाल्यापासून गोखले बिल्डर्सच्या संपत्तीत कशी वाढ झाली हा प्रचंड मोठा विषय आहे. मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की दोन दिवस तुम्ही यावर काही बोलू नका, मी तुम्हाला यातून तोडगा काढून देतो. त्यावर मी गप्प बसलो आणि आता त्यांचा ई-मेल आला आहे. एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण होताना दिसत आहे. मी दोन दिवस मोहोळ यांच्याविरोधात बोललो नाही. मात्र, या विकृतीविरोधात मी बोलत राहणार.
या विकृतीविरोधात आंदोलन चालू राहणार : धंगेकर
दरम्यान, धंगेकर यांना विचारण्यात आलं की तुमचं मोहोळ यांच्याविरोधातील आंदोलन आता संपलं आहे का? यावर धंगेकर म्हणाले, “माझं या विकृतीच्या विरोधातील आंदोलन चालू राहील. मी दोन दिवस मोहोळ यांच्याविरोधात बोललो नाही. परंतु, अशी विकृती समोर येईल तेव्हा मी बोलणार. मी एकनाथ शिंदे यांच्याकडून तसा शब्द घेतला आहे. त्यांनी सांगितलं म्हणून दोन दिवस मी काही बोललो नव्हतो. आता विषय मार्गी लागताना दिसत आहे. परंतु, यापुढे असं काही समोर आलं तर या विकृतीवर मी बोलत राहणार. माझ्यासमोर कोणतीही व्यक्ती असली तरी मी बोलणार.”
