महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. तीनही पक्षांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्यानंतर आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून या पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. मविआमधील तीनही पक्षांना २८८ पैकी फक्त ४६ जागा जिंकल्या. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारे १० टक्क्यांचे संख्याबळ एकाही पक्षाकडे सध्या नाही. शिवसेना (ठाकरे) पक्षाला २०, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला फक्त १० जागा जिंकता आल्या. विरोधी पक्षनेतेपदासाठी २८८ पैकी १० टक्के म्हणजे २९ जागा असण्याची आवश्यकता आहे. मात्र पुरेसे संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल, अशी चर्चा असताना आता तीनही पक्षांची हे पद मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू आहे, अशी बातमी इंडिया टुडेने दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांनी इंडिया टुडेला दिलेल्या बातमीनुसार, त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आणि उपाध्यक्ष पद मागितले आहे. याचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, विरोधी पक्षनेतेपदाचा चेहरा कोण असणार, यावर अद्याप मविआच्या घटक पक्षांची चर्चा झालेली नाही.

नाना पटोले यांनी याआधी अध्यक्षपद आणि विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविल्यामुळे त्यांच्या नावाचा या पदासाटी पुन्हा विचार होण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेने (ठाकरे) भास्कर जाधव यांना पक्षाचा गटनेता तर सुनील प्रभू यांना मुख्य प्रतोद म्हणून नेमले आहे.

विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप करत मविआच्या आमदारांनी विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी आमदारकिची शपथ घेण्यास नकार दिला. मात्र अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी या आमदारांनी शपथ घेतली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rift in maha vikas aghadi over maharashtra leader of opposition post kvg