Rohit Pawar allegation : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल १,८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेली पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन अवघ्या ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचं गंभीर प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात विरोधकांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.
रोहित पवारांनी सोशल मीडियावर घोटाळ्यांची यादीच पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी राज्यात झालेल्या जमीन घोटाळ्यांचा उल्लेख केला आहे. सरकारने ‘गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन’ अशी नवी योजना सरकारने सुरू केल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे.
रोहित पवारांनी दिलेली यादी पुढीलप्रमाणे –
- नवी मुंबईत शिंदे साहेबांचा गट – ५००० कोटीची सिडको जमीन
- पुण्यात देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा –१८०० कोटीची जैन बोर्डिंग जमीन
- पुण्यात देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा- ५०० कोटीची मोबोज हॉटेल कंपाऊंड इव्याकु प्रॉपर्टीची जमीन
- संभाजीनगरमध्ये शिंदे साहेबांचा गट – #MIDC ची राखीव जमीन
- संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भाजपा –२०० कोटीची अंजली टॉकीजची जमीन
- पुण्यात अजित दादांचा गट –३०० कोटीची कोरेगाव पार्क जमीन
- अहिल्यानगरमध्ये अजित दादांचा गट – जैन समाजाची जमीन
- नवी मुंबई विमानतळाजवळ अवैध गौण खनिज उत्खनन घोटाळा – ३००० कोटी
- मुंबईत देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा – SRAच्या हजारो कोटींच्या जमिनी
- नाशिकमध्ये शिंदे साहेबांचा गट – त्र्यंबकेश्वर जमीन
- मुंबईत देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा – भाजपा कार्यालयाची जमीन
“हे सर्व घोटाळे बघता शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी अजितदादा गट या तिन्ही सत्ताधारी पक्षांनी अधिकार्यांना हाताशी धरून कायदे – नियमांना धाब्यावर बसवून जमिनी लाटणारी “गुन्हेगारांना जामीन – नेत्यांना जमीन” अशी नवी योजना सरकारमार्फत सुरू केलीय असेच म्हणावे लागेल. “करून वोटचोरी- करू जमिनीची लुटमारी” असे नवे ब्रीदवाक्य सरकारने ठेवायला हरकत नाही” असेही रोहित पवार म्हणाले आहेत.
भाजपावर गंभीर आरोप
यावेळी रोहित पवारांनी यावेळी गंभीर आरोपही केला आहे. राज्यात भाजपाशी संबंधित प्रकरणे आली की चौकशीच्या आधीच क्लीन चीट दिली जाते आणि इतर दोन मित्रपक्षांची प्रकरणे असली की चौकशीची बनाव होतो असे रोहित पवार म्हणाले आहेत.
“भाजापशी संबंधित प्रकरणे आली की चौकशी आधीच क्लीन-चीट द्यायची आणि इतर दोन मित्रपक्षांची प्रकरणे असली की पॉलिटिकल स्कोर सेटल होईपर्यंत आणि पॉलिटिकल बार्गेनिंग होईपर्यंत चौकशीचा बनाव करायचा अशा प्रकाराची ‘आपला तो बाबू आणि दुसऱ्याचे ते कार्ट’ ही भाजपची कार्यपद्धती दिसून येते. परिणामी महाराष्ट्रात हे जे सर्व काही घोळ सुरू आहेत त्यासाठी सरकारचे प्रमुख म्हणून प्रामुख्याने मुख्यमंत्री जबाबदार असून आणि त्यांनी या सर्व घोळांची जबाबदारी घ्यावी. असो, मुख्यमंत्री या सर्वच प्रकरणांची कुठलाही भेदभाव न करता पारदर्शकपणे चौकशी करतील का? हे बघणं महत्वाचं ठरेल!” असेही रोहित पवार म्हणाले आहेत.
