लोकसभा निवडणुकांसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचारात एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अजित पवार गटाकडून बारामती मतदारसंघात घेतलेल्या प्रचारसभेतील असंच एक विधान सध्या चर्चेत आलं आहे. वंचित बहुजन आघाडीनं दोन आठवड्यांपूर्वीच उमेदवारी जाहीर झालेले पण नंतर रद्द करण्यात आलेले मंगलदास बांदल यांनी अजित पवार व्यासपीठावर असताना शरद पवारांबाबत केलेल्या विधानामुळे रोहित पवार संतप्त झाले आहेत. बांदल समोर असते तर कानाखाली लावली असती, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं घडलं काय?

अजित पवार गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत मंगलदास बांदल यांनी शरद पवारांवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली. “सूर्यकांत पलांडे शिरूरचे आमदार होते. शरद पवार त्यांना सोडून निघून गेले. त्यावेळी पलांडे हात मागे घेऊन भाषण करायचे. या काळात त्यांच्या हातावर कोडाचा प्रकार आला. त्यामुळे ते बाह्या पुढे घेत होते. शरद पवारांनी त्यांनाही सोडलं नाही. ते म्हणाले, तुमच्या तालुक्यातला एक गडी फार बाह्या सरसावून भाषण करायचा, आता का बाह्या पुढे करतोय?” असं पलांडे भाषणात म्हणाले.

Video: “सर्व संस्था त्यांनी काढल्या, पण जन्म झाला नव्हता”, अजित पवारांचा टोला, पुतण्यांचा उल्लेख करत म्हणाले…

“अरे तुम्ही सगळ्यांच्या व्यंगावर बोललात ना? तुम्ही कुणावर नाही बोललात? दिलीप ढमढेरे जुन्नरचे आमदार होते. त्यांचा पाय तुटलेला होता. शरद पवार म्हणाले पाठिंबा द्यायचा असेल तर दोन्ही पायांनी द्या, दीड पायांनी देऊ नका. तुमच्या व्याधीवर कुणीही बोललेलं नाही. तुमची किंमत यशवंतराव चव्हाणांची किंमत आहे एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला जरी आजार झाला, तरी महाराष्ट्रातल्या कुठल्या माणसानं तुमची प्रतारणा केली नाही. कारण यशवंतरावांची पिढी अजूनही जिवंत आहे”, असं बांदल म्हणाले.

रोहित पवारांचा संताप

दरम्यान, रोहित पवारांनी यावर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये संताप व्यक्त केला. “एक कुठलातरी वेडा माणूस तिथे व्यासपीठावर आणला होता बांदल नावाचा. समोर असता तर कानाखाली मारण्याची माझी इच्छा झाली होती. अजित पवारांची काही बोलण्याची हिंमत झाली का? तिथे खाली मान घालून बसले होते. थोडी तरी हिंमत झाली का त्याला ‘ए खाली बस’ बोलण्याची? आहेत ना तुम्ही वाघासारखे बोलणारे? मग आज काय झालं? तुम्ही मांजरासारखे बसले होते”, असं रोहित पवार म्हणाले.

‘वंचित’कडून मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द

“तुमची त्याला शांत बसवायची हिंमत झाली नाही का? की मग तुम्हाला ज्या गोष्टी बोलता येत नाहीत, त्या तुम्ही असल्या पाळलेल्या मांजरांकडून बोलून घेताय? हे असलं राजकारण बाजूला ठेवा. तुम्ही दुसऱ्याच्या तोंडातून शरद पवारांबद्दल बोलून घेताय. हे मी खपवून घेणार नाही”, असं रोहित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar slams ajit pawar for mangaldas bandal speech about sharad pawar pmw
First published on: 21-04-2024 at 09:49 IST