Anil Deshmukh News : निलंबित पोलीस अधिकारी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण तसंच अँटेलिया प्रकरणातला आरोपी सचिन वाझेने आरोप केला आहे की अनिल देशमुख त्यांच्या पीएमार्फत पैसे घेत होते. शनिवारी सकाळी हा आरोप करुन सचिन वाझेने खळबळ उडवून दिली. तसंच मी या संदर्भात देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे असंही सचिन वाझेने म्हटलं आहे. आता अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी माध्यमांसमोर येत पुन्हा एकदा सचिन वाझे हा देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन बोलतो आहे असं म्हटलं आहे. तसंच चांदिवाल समितीचा अहवाल सादर करा अशी विनंती त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. सचिन वाझेचा आरोप काय? गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ३ ऑगस्टला सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. “अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे”, असा आरोप सचिन वाझेने केला. या आरोपानंतर आता अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे पण वाचा- Devendra Fadnavis : सचिन वाझेंनी देशमुखांवर केलेल्या आरोपानंतर फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही योग्य ती चौकशी…” काय म्हणाले अनिल देशमुख? तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीच सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांना माझ्यावर आरोप करायला लावले होते. देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी जे आरोप करायला सांगितले होते तेच आरोप सचिन वाझेने शनिवारी केले आहेत. माझ्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा मी स्वतः मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की जे आरोप झाले आहेत त्याची चौकशी करावी. त्यावेळेस सरकारने हायकोर्टाचे जज चांदिवाल यांना चौकशीचे आदेश दिले. या संपूर्ण प्रकरणाची न्यायमूर्ती चांदिवाल यांनी ११ महिने चौकशी केली. चांदिवाल यांनी ११ महिने चौकशी करुन तो अहवाल दोन वर्षांपूर्वी सरकारला दिला आहे. तो अहवाल सध्या गृहखात्याकडे आहे. चांदिवाल समितीचा अहवाल सरकारने समोर आणावा अशी पुन्हा माझी मागणी आहे. १४०० पानांचा तो अहवाल आहे. राज्य शासन चांदिवाल समितीचा अहवाल आणत नाहीत. तो अहवाल त्यांनी जनतेसमोर आणावा अशी माझी त्यांना विनंती आहे. असं अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) म्हणाले. सचिन वाझेंनी देशमुखांवर केलेल्या आरोपानंतर फडणवीसांचं सूचक विधान, (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम) सचिन वाझे या दहशतवाद्याची मदत देवेंद्र फडणवीस घेत आहेत सचिन वाझे हा दहशतवादी आहे, दोन खुनांचा तो आरोपी आहे. अशा सचिन वाझेची मदत देवेंद्र फडणवीसांना घ्यावी लागते आहे ही आश्चर्याची बाब आहे. सचिन वाझेसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला आरोप करायला सांगितलं जातं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच हे आरोप केले जात आहेत. असं अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेचं पत्र आपल्याला आल्याचं माध्यमांतील बातम्यांमधून मी पाहिलं. त्या पत्रात काय आहे हे मी पाहिलेलं नाही. ते पत्र पाहिल्यावर मी त्याबद्दलची सविस्तर प्रतिक्रिया देईन असं म्हटलं आहे.