चिपळूण – वन विभागाने “ऑपरेशन चंदा” या व्याघ्र संवर्धन उपक्रमांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील तरुण वाघिणीचे यशस्वीरीत्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण केले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम भारतीय वन्यजीव संस्था यांच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

सुमारे तीन वर्षांची ही वाघीण एनटीसीएच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांनुसार ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खडसांगी परिक्षेत्रातून सुरक्षितरीत्या पकडण्यात आली. तिला योग्य पशुवैद्यकीय उपचार देऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे समर्पित वन्यजीव वाहतुकीच्या वाहनातून स्थलांतरित करण्यात आले. सध्या तिला सोनारली येथील एनक्लोजरमध्ये “सॉफ्ट रिलीज” पद्धतीने सोडण्यात आले असून, पुढील टप्प्यांत वनात सोडण्यापूर्वी तिचे निरीक्षण करण्यात येणार आहे.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व पेंच व्याघ्र प्रकल्प येथील तीन नर व पाच मादी अशा एकूण आठ वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प येथे स्थानांतरण करण्यास मंजुरी दिली आहे. त्यातील एका वाघीणचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आगमन झाले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया काटेकोर सुरक्षा मानदंड पाळून व सततच्या निरीक्षणाखाली पार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण – क्षेत्र संचालक तुषार चव्हाण या मोहिमेची माहिती देताना म्हणाले की, बुधवार १२ नोव्हेबर रोजी दुपारी ४ वाजता वाघीण पकडण्याची मोहीम तोडोबा येथे सुरु झाली. ही वाघीण ५ वाजता पकडून पिंज-यात बंदिस्त करण्यात आली.

कागद पत्र, वैद्यकीय सर्व तपासण्या, फिटनेस पाहून रात्री १० वाजता कराड च्या दिशेने प्रवास सुरु झाला, शुक्रवारी  रात्री दीड वाजता सर्व टीम वाघीण घेऊन चांदोली येथे दाखल झाली. पुन्हा एखदा वैद्यकीय तपासण्या, फिटनेस पाहून पहाटे ३.२० ला वाघीण एनक्लोजरमध्ये “सॉफ्ट रिलीज”करण्यात आले. जवळपास १००० किमी चे अंतर २७ तास प्रवास करून वाघीण सुरक्षित खास वेगळ्या पिंज-यातून चांदोली येथे दाखल झाली. या सोडण्यात आलेल्या चंदा वाघिणीस सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मधील नवीन नाव तारा असे देण्यात आले आहे.

या मोहिमेदरम्यान वाघिणीची प्रकृती चांगली राखण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथील वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. खोब्रागडे यांनी नेतृत्व केले.

हे यशस्वी स्थानांतरण महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. ताडोबा व सह्याद्री येथील पथकांनी केलेल्या समन्वित, वैज्ञानिक आणि जबाबदार कार्यामुळे हा प्रयत्न यशस्वी झाला आहे. 

“ऑपरेशन चंदा हा सह्याद्रीसाठी ऐतिहासिक पुढचा टप्पा आहे. या वाघिणीच्या सॉफ्ट रिलीजमुळे सह्याद्रीतील वैज्ञानिक पुनर्स्थापना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. आमच्या पथकाने ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत जबाबदारीने व सुरळीतरीत्या पार पाडली. डब्ल्यूआयआयच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्यपूर्ण निरीक्षण करून सह्याद्रीला पुन्हा सक्षम व्याघ्र अधिवास बनवू.” – तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प