सांगली : रस्त्याकडेला आईच्या कुशीतून अपहरण करण्यात आलेले बाळ पोलिसांनी तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनतर शोधून काढत आईच्या कुशीत पुन्हा सुपूर्द गेले. याप्रकरणी एका महिलेसह तिघांची टोळी उघडकीस आली असून, एकाला अटक करण्यात आली आहे. अन्य दोघेजण परागंदा असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शुक्रवारी दिली.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावर फुगे विक्री करणारे विक्रम पुषपचंद बागरी (रा. कनवसा, जि. कोटा, राजस्थान) हे पत्नी व एक वर्षाच्या मुलासह दिवाळीच्या सणात फुगे विक्री करण्याच्या इराद्याने सांगलीत फिरत आले होते. दिवसभर फुगेे विक्री केल्यानंतर सांगली-मिरज रस्त्याकडेला झोपी गेले.

झोपेत असतानाच मंगळवारी पहाटे आईच्या कुशीत निद्राधीन असलेल्या एक वर्ष वयाच्या बालकाचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके तैनात करण्यात आली होती.

रस्त्यावरील १०० हून अधिक चित्रीकरणाचे विश्लेषण करत तब्बल तीन दिवसांनी म्हणजे गुरुवारी या बालकाबाबत पोलिसांना माग मिळाला. यानुसार संशयित इनायत अब्दुलसत्तार गोलंदाज (वय ४३, रा. किल्ला भाग, मिरज) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीमध्ये एका महिलेसह दोघांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. या टोळीने सावर्डे (जि. रत्नागिरी) येथील एका व्यक्तीला हे बाळ विकले असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांच्या पथकाने सावर्डे येथे जाऊन सचिन राजेशिर्के या व्यक्तीच्या ताब्यातून अपहृत बालकाला ताब्यात घेतले. राजेशिर्के यांना मूलबाळ नसल्याने ते मूल कायदेशीररीत्या मिळवण्याच्या प्रयत्नात असताना वासिमा पठाण ही महिला त्यांच्या संपर्कात आली. तिने काही पैशांच्या बदल्यात मूल देण्याचे मान्य केले. यानुसार काही रक्कम घेऊन दिवाळीच्या मुहूर्तावर अपहृत बालक राजेशिर्के यांच्या ताब्यात दिले. याबाबतची कायदेशीर प्रक्रिया दिवाळीनंतर करू, असे सांगितले होते.

दरम्यान, बाळाचे अपहरण करून त्याची विक्री करणारी ही टोळी असून, यामध्ये महिलेचाही सक्रिय सहभाग आहे. ती व इम्तियाज पठाण हे परागंदा झाले असल्याचे अधीक्षक श्री. घुगे यांनी सांगितले. या दोघांचाही शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक तैनात असून, त्यांनाही लवकरच जेलबंद केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. यातील पठाण याच्यावर यापूर्वी खंडणी, फसवणूक, विनयभंग आणि मारामारीचे गुन्हे मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल असल्याचेही अभिलेखावरून स्पष्ट झाले असल्याचेही ते म्हणाले.

संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपासात बालकाचा सौदा किती रुपयांना झाला होता, आणखी काही प्रकार घडले आहेत का याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक श्री. भालेराव यांनी सांगितले.