सांगली : अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताने पलायन केल्याचा प्रकार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात घडला. मुलीच्या अपहरणानंतर तब्बल दहा दिवसांनी कर्नाटकातून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताने पलायन केल्याने पोलिसांची त्रेधा उडाली. पलायन करण्यात आलेल्या संशयिताला पकडण्यासाठी समाज माध्यमातून नागरिकांना मदत करण्याचे आवाहन पोलिसांकडून गुरुवारी करण्यात आले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. २ ऑक्टोबर रोजी मिरज पूर्व भागातील एका गावातून अल्पवयीन पीडितेचे फूस लावून अपहरण झाले होते. या प्रकरणी आईने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात रितसर तक्रारही दहा दिवसांपूर्वी दाखल केली होती. पीडितेच्या आईने याबाबत तक्रार करून पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर पोलिसांनी हालचाल करून संशयितांचा शोध सुरू केला.

पीडितेचा शोध घेत असताना पोलिसांना संशयित तरुण मुलीसह गदग (कर्नाटक) या शहरात आश्रयास असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी गदगमधून संबंधिताला ताब्यात घेत चौकशीसाठी आणले होते. मात्र, वाहनातून उतरून पोलीस ठाण्याच्या पायऱ्या चढत असतानाच संशयित तरुणाने पोलिसांच्या हाताला हिसडा देऊन पलायन केले. या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात खळबळ माजली. संशयिताला पकडण्यासाठी धावपळही करण्यात आली. मात्र, तो पोलिसांच्या हाती तुरी देऊन पसार होण्यात यशस्वी ठरला. या प्रकरणाचा तपास महिला अधिकारी करत असून, त्यांच्या हलगर्जीपणामुळे संशयिताने पलायन केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान, याबाबत पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्याशी संपर्क साधला असता संशयिताने पोलीस ठाण्याच्या आवारातून पलायन केेल्याचे मान्य केले. तसेच त्याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा आणि बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे सांगितले. पलायन केलेल्या संशयिताला पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आल्याचे सांगून लवकरच त्याला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. अपहरण करण्यात आलेली पीडिता सुखरूप असून, तिची वैद्यकीय तपासणी करून तिला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत असल्याचेही निरीक्षक श्री. सिद यांनी सांगितले.

गुरुवारी याबाबत पोलिसांनी समाज माध्यमातून संशयिताचे छायाचित्र प्रसारित करून त्याला पकडण्यासाठी नागरिकांनी मदत करावी, असे आवाहन केले आहे. समाज माध्यमातील विविध समूहातून संशयिताचे छायाचित्र प्रसारित करण्यात आले आहे.