Vishal Patil : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत असताना शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांवरही जोरदार टीका केली. शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत आणि उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य आहेत असं अमित शाह यांनी म्हटलं. अमित शाह यांनी केलेल्या टीकेला आता सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी उत्तर दिलं आहे. विशाल पाटील नेमकं काय म्हणाले? (What Vishal Patil Said?) विशाल पाटील (Vishal Patil) म्हणाले, २०२४ चा अर्थसंकल्प आता मांडला जाईल. जानेवारीत जसा अर्थसंकल्प या सरकारने मांडला होता तसाच तो असेल तर देशासाठी तो निराशाजनक असणार आहे. किमान हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांकडे पाहून मांडला जाईल अशी अपेक्षा आम्हाला सगळ्यांनाच आहे. महाराष्ट्रातले तीन मुद्दे या अधिवेशनात मी मांडणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर मला बोलायचं होतं पण ती संधी मिळाली नाही. या अधिवेशनात राज्याचे मुद्दे मांडायची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे असंही विशाल पाटील म्हणाले. हे पण वाचा- अमित शाह यांची शरद पवारांवर टीका; सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “याच शरद पवारांना मोदी सरकारने…” महागाई, बेरोजगारी हा देशासमोरचा मुख्य मुद्दा महागाई, बेरोजगारी हे मु्द्दे देशापुढचे प्रमुख मुद्दे आहेत. मराठा समाजाला आरक्षण हे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मिळालं. शरद पवारांकडे सगळेच समाज आशेने पाहतात. भाजपाने शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांना टार्गेट करायचं ठरवलेलं दिसतं आहे, असंही विशाल पाटील (Vishal Patil) म्हणाले आणि त्यांनी अमित शाह यांच्या टीकेला उत्तर दिलं. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं तर.. भाजपाने राज्यातील दोन प्रमुख नेते म्हणजेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टार्गेट करायचं ठरवलेलं दिसतं आहे. मी एक सांगू इच्छितो की शरद पवार, उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं तरीही त्यांची सहानुभूती वाढत जाणार आहे. अमित शाह यांनी पुण्यात राजकारणाच्या पलिकडे जाऊन बोलायला हवं होतं, मात्र दुर्दैव आहे की ते तसं काहीच बोलले नाहीत. हिंदू-मुस्लिम मुद्दा बनवून राज्यात लोकसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न झाला मात्र तो चालला नाही, असंही विशाल पाटील (Vishal Patil) म्हणाले. एबीपी माझाशी बोलताना ही प्रतिक्रिया त्यांनी दिली. विशाल पाटील यांनी अमित शाह यांच्यावर आणि भाजपावर जोरदार टीका केली. अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांविषयी काय वक्तव्य केलं? "भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर शरद पवार आहेत" अशी टीका अमित शाह यांनी केली आहे. "भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केलं आहे" असंही अमित शाह म्हणाले. "कसाबला बिर्याणी खायला देणाऱ्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे गेले आहेत, याकुब मेमनला सोडण्याची मागणी करणाऱ्यांबरोबर ठाकरे बसले आहेत, झाकिर नाईक यांना शांततादूत बनवणाऱ्यांच्या मांडीवर उद्धव ठाकरे बसले आहेत, PFI या संघटनेला पाठिंबा देणाऱ्यांचा मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले आहेत, संभाजीनगरला विरोध करणाऱ्यांना पण हे साथ देत आहेत, यांना लाज वाटली पाहिजे ” अशी टीका अमित शाह यांनी यावेळी केली. राज्यात ‘ औरंगजेब फॅन क्लब ‘ म्हणजे कोण तर ते म्हणजे महाविकास आघाडी. आणि या औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत उद्धव ठाकरे असंही अमित शाह म्हणाले.