सांगली : पंधरा दिवसांच्या खंडानंतर शनिवारी सांगली, मिरज शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस झाला. रब्बी हंगामातील पेरण्यासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असला, तरी काढणीला आलेल्या खरीप हंगामातील मूग, उडीद या कडधान्यासाठी नुकसानकारक ठरला आहे.

गेले पंधरा दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र, अधूनमधून खंडित स्वरूपात हलका पाऊस पडत होता. मात्र, शनिवारी सकाळपासून पश्चिम भागातील शिराळा तालुक्यात दमदार पाऊस सुरू होता, तर सांगली व मिरज शहर परिसरात दुपारी बारा वाजल्यापासून दमदार पाऊस झाला. पावसाने सखल भागात पाणी तर साचलेच, पण रस्त्यावर फूट-दीड फूट पाणी वाहत होते. दुपारी दमदार पाऊस झाल्यानंतर सायंकाळपर्यंत पावसाच्या हलक्या सरी येत होत्या.

जिल्ह्याच्या पूर्व भागात मात्र अपेक्षित पाऊस झाला नसला, तरी हवामानात बदल झाला आहे. दिवसभर ढगाळ हवामान होते. मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील आरग, बेडग, एरंडोली परिसरात दमदार पाऊस झाला असला, तरी भोसे, कळंबी, मालगाव परिसरात पावसाचा जोर कमी होता. सध्या खरीप हंगामातील उडीद, मूग कडधान्याची काढणी सुरू असून, आगाप पिकाची काढणी आटोपत आली असली, तरी मागास पिकाच्या शेंगा तयार झाल्या आहेत.

आजच्या पावसाने शेंगा फुटून उत्पादनात घट येण्याची भीती आहे. तर रब्बी हंगामातील पिकाच्या पेरणीसाठी म्हणजेच शाळू, करडई, हरभरा या जिरायत पिकाच्या पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणारा आहे.

शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी दोन मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली, तरी सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यातील शिरसी मंडळात १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या महिन्यात जिल्ह्यात एकूण पाऊस २०.३ मिलिमीटर झाला असला, तरी सरासरीच्या तुलनेत १४.६ टक्केच पाऊस झाला आहे.

पश्चिम भागातील शिराळा तालुक्यात दमदार पाऊस सुरू होता, तर सांगली व मिरज शहर परिसरात दुपारी बारा वाजल्यापासून दमदार पाऊस झाला. पावसाने सखल भागात पाणी तर साचलेच, पण रस्त्यावर फूट-दीड फूट पाणी वाहत होते. दुपारी दमदार पाऊस झाल्यानंतर सायंकाळपर्यंत पावसाच्या हलक्या सरी येत होत्या. जिल्ह्याच्या पूर्व भागात मात्र अपेक्षित पाऊस झाला नसला, तरी हवामानात बदल झाला आहे. दिवसभर ढगाळ हवामान होते. मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील आरग, बेडग, एरंडोली परिसरात दमदार पाऊस झाला असला, तरी भोसे, कळंबी, मालगाव परिसरात पावसाचा जोर कमी होता.