इंडिया आघाडीत जागावाटपासंदर्भात कुठलाही संदर्भ नाही. ओरबडण्याचं आमचं धोरण नाही. मंगळवारच्या बैठकीत पृथ्वीराज चव्हाणही होते. त्यांची भूमिकाही हीच आहे. आम्हाला जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. वंचित बहुजन आघाडीनेही मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातल्या जागा जिंकून आपल्याला संविधानावरचा हल्ला परतवून लावायचा आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत.

तुतारी आणि मशाल ही चिन्हं लोकांपर्यंत पोहचली आहेत

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आम्ही सगळे एकत्र आहोत. तुतारी आणि मशाल लोकांपर्यंत पोहचली आहे. प्रचार तर आम्ही करणारच आहोत. डिजिटल युगात चिन्ह पोहचायला फार वेळ लागत नाही. शरद पवारांच्या पक्षाला तुतारी चिन्ह मिळालं. आम्हाला मशाल चिन्ह मिळालं. ज्यांना धनुष्यबाण मिळाला त्या धनुष्याची प्रत्यंचा जागेवर आहे का? तसंच घड्याळ ज्यांना मिळालं ते घड्याळ चालू आहे का? हे बघावं लागेल असं संजय राऊत म्हणाले.

अमित शाह यांना संजय राऊत यांचं प्रत्युत्तर

अमित शाह इंडिया आघाडीत घराणेशाही म्हणत असतील तर त्यांचं वक्तव्य हास्यास्पद आहे. घराणेशाही इंडिया आघाडीत नाही तर भाजपात आहे. जय शाहने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारले आहेत का? सचिनपेक्षा जास्त शतकं ठोकली आहेत का? की त्यांना बीसीसीआयचं अध्यक्ष केलं? अमित शाह गृहमंत्री नसते तर जय शाह हे बीसीसीआयमध्ये असते का? घराणेशाही म्हटलं जातं तेव्हा घराण्याची प्रतिष्ठा आहे. ठाकरे घराण्याला प्रतिष्ठा आहे. या प्रतिष्ठेचा फायदा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही झाला आहे. आम्ही स्वार्थाचं राजकारण करत नाही. शरद पवारांची घराणेशाही आहे का? त्यांनी कृषी क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम केलं आहे त्याचा गौरव तुमच्या सरकारने केला आहे. घराणेशाही जर कुणी वाढवली असेल तर तो भाजपा आहे. ज्याला कुटुंब असतो तो घराणेशाहीच्या गोष्टी बोलतात.