Shivsena UBT MP Sanjay Raut on Eknath Shinde : शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी मराठा आंदोलनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पाठबळ होतं असं सूचक वक्तव्य केलं आहे. राऊत यांनी शिंदे यांचं थेट नाव घेतलं नाही. मात्र, “वाशीमध्ये (नवी मुंबई) जरांगे यांच्याबरोबर गुलाल उधळणारे आंदोलकांना रसद पुरवत होते”, असं राऊतांनी म्हटलं आहे. “इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलकांना इथे आणलं, त्यांच्या गाड्या इथे आल्या, या सगळ्यात त्यांचंच (शिंदे) नाव पुढे येतय” असं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, “या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला गेला,” असा दावा देखील त्यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चालू असताना राज्यात जाती-जातीत संघर्ष व्हावा, अशी काही घटकांची इच्छा होती. मुळात मनोज जरांगे यांनी माघार घेऊच नये असंही काही जणांना वाटत होतं. जरांगे यांच्या आंदोलनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अडचणीत यावं असं सरकारमधीलच काही लोकांना वाटत होतं.”
एकनाथ शिंदे राज्य सरकारच्या बैठकीला अनुपस्थित?
खासदार राऊत म्हणाले, “मागील वेळी मनोज जरांगे यांच्याबरोबर नवी मुंबईतील वाशी येथे गुलाल उधळणारे (एकनाथ शिंदे) यावेळी राज्य सरकारच्या बैठकीला उपस्थित नव्हते. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या अंतिम बैठकांमध्ये ते कुठेच दिसले नाहीत. मुळात ते असायला हवे होते. जाणीवपूर्वक त्यांना बाजूला ठेवण्यात आलं, हे सगळं संशयास्पद आहे.”
“एकनाथ शिंदेंना निर्णयप्रक्रियेपासून दूर का ठेवलं” एकनाथ शिंदेंचा प्रश्न
“मनोज जरांगे यांच्याबरोबर वाशी येथे गुलाल उधळणारे (शिंदे) यावेळी मराठ्यांचं आंदोलन झालं तेव्हा आणि सरकारने त्यावर तोडगा काढला तेव्हा कुठेही दिसले नाहीत. ते असायला हवे होते. परंतु, ते नव्हते. कारण महायुतीकडे कुठलंही धोरण नाही. महायुती ही तीन चाकांची रिक्षा आहे आणि ही तीन चाकं वेगवेगळ्या दिशेला धावत आहेत. मराठा आंदोलन हाताळताना मुख्यमंत्री फडणवीस यांचं धोरण काय होतं? खास करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या सगळ्यापासून दूर का ठेवलं गेलं?”
संजय राऊत म्हणाले, “मराठा आंदोलनाच्या निमित्ताने इतके लोक इथे (मुंबईत) आणले, त्यांच्या गाड्या इथे कशा आल्या? या सगळ्यात त्यांचंच नाव पुढे येतंय. तसेच आरक्षण मिळवणं हा त्यांचा मुख्य उद्देश नव्हता. मुंबईत येऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान उभं करणं हे त्यांचं प्रमुख उद्दीष्ट होतं.”