भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी सरकारने आमदार राहुल कुल यांना क्लीन चिट दिली आहे. यावरून संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकार म्हणजे क्लीन चिट देणारा कारखाना आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसंच, भाजपा आणि राष्ट्रवादीतील इतर नेत्यांवरही राऊतांनी निशाणा साधला आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारला धारेवर धरलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“दौंड न्यायालयाने तक्रारदार नामदेव ताकवणे यांच्या तक्रारीला महत्त्व देऊन कारखान्याचे चेअरमन, लेखापरिक्षक यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यात काही तथ्य असल्याशिवाय न्यायालय आदेश देणार नाहीत. या कारखान्यातील त्रुटी, घोटाळ्यांची सविस्तर माहिती गृहमंत्र्यांना मी दिली आहे. सीबीआय आणि ईडीलाही माहिती पाठवली आहे. तरीही चौकशीशिवाय सरकार क्लिनचीट देत असेल तर कोणीही घोटाळा करावा आणि वॉशिंग मशिनमध्ये जावं, घुसळून काढावं आणि बाहेर यावं असं झालं आहे. भ्रष्टाचार करणारा त्यांच्या पक्षाचा माणूस आहे, त्यामुळे आपण त्याला वाचवलं पाहिजे, ही गृहमंत्र्यांची भूमिका आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >> ५०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झालेले राहुल कुल कोण आहेत?

“भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात शेतकरी सभासद आहेत. शेतकऱ्यांचे ५०० कोटी चोरले आहेत. लेखापरिक्षकांना क्लीन चिट देताय, उद्या आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही कारवाई करू”, असंही राऊत म्हणाले.

क्लीन चिटचा कारखाना

“दादा भुसे यांनी १७८ कोटींचा घोटाळा केला. यांनी क्लीन चिटचा कारखानाच उघडला आहे. अब्दुल सत्तारांनी घोटाळा केला. मी म्हणालो राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेला झाकीर नाईकने साडेचार कोटींची मदत केली. इक्बाल मिर्ची, दाऊद इब्राहिम यांच्याकडून काही व्यवहार झाल्याने आमचे काही लोक तुरुंगात आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप झाल्यानंतर ईडीने कारवाई केली, ते आता मोठे झाले. नवाब मलिक तुरुंगात आहेत. मग झाकिर नाईक यांच्याकडून पैसे मिळालेल गृहस्थ मंत्रिमंडळात कसे? विखे पाटील स्वतः सांगतात की चार कोटी नाही अडीच कोटीच मिळालेत”, असं संजय राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut got angry when rahul kul got a clean chit in the corruption case said tomorrow our government sgk