Sanjay Raut Press Conference Statement on Devendra Fadnavis Uddhav Thackeray Meeting : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे (उबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (१७ डिसेंबर) नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीची देशभर चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या प्राचारादरम्यान एकमेकांवर टीका करणारे हे दोन नेते एकत्र बसून हसत चर्चा करत असल्याचं पाहून अनेकांना धक्का बसला. परंतु, हीच महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे असं हे दोन्ही नेते म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या एका टीकेवरून त्यांना प्रश्न विचारला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी ३१ जुलैच्या दिवशी मुंबईतील रंगशारदा सभागृहात एक मेळावा घेतला होता. या मेळाव्यात ते म्हणाले होते, “मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस डाव आखत होते. मात्र मी सगळं काही सहन करुन उभा राहिलो आहे. आता एक तर तू राहशील किंवा मी राहीन. गीतेमध्येही हेच आहे. अर्जुनाने पाहिलं की त्याच्यासमोर त्याचे नातेवाईकच उभे आहेत तेव्हा त्यालाही यातनाच झाल्या होत्या. मलाही यातना होत नसतील का?”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फडणवीसांना ‘तू राहशील किंवा मी राहीन’ असं आव्हान देणारे उद्धव ठाकरे काल फडणवीसांना भेटल्यानंतर आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी यावरून शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारली असता राऊत म्हणाले, “ते प्रचारकाळात केलेलं वक्तव्य होतं”.

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Winter Session LIVE Updates : दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले अजित पवार आज विधानसभेत हजर राहणार?

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

संजय राऊत म्हणाले, “कालच्या भेटीची जोरदार चर्चा करायला काहीच हरकत नाही. आपल्या महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आहे, एक राजकीय संस्कार आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते आजी मुख्यमंत्र्यांना भेटले. उद्धव ठाकरे हे विधीमंडळ सदस्य असून सध्या नागपुरात विधीमंडळाचं अधिवेशन चालू आहे. त्यानिमित्त उद्धव ठाकरे नागपुरात आहेत. त्याचदरम्यान त्यांनी फडणवीसांची भेट घेतली. राज्यात नवं सरकार स्थापन झालं आहे. प्रचाराच्या तोफा आता थंड पडल्या आहेत. महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालं असून त्यांनी राज्याच्या हिताचं काम करावं. महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या कल्याणाचं काम करावं यासाठी शुभेच्छा द्यायला उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटले असतील. त्या भेटीमुळे खळबळ माजण्याचं काही कारण नाही”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut reaction on uddhav thackeray devendra fadnavis meeting asc