राज्यात कांद्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यात कांदा लिलाव बंद आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री, बाजार समित्यांचे पदाधिकारी, व्यापारी आणि अन्य संबंधितांच्या उपस्थितीत मंगळवारी (२७ सप्टेंबर) महत्त्वाची बैठक पार पडली. परंतु, या बैठकीतून कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. दरम्यान, कांदा उत्पादक शेतकरी, कांदा खरेदी व्यापारी आणि ग्राहक या सर्वाच्या हिताचाच शासन विचार करणार असून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीतून दिली.

अजित पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना कांदा व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. कांद्याचे दर पडत असल्याने शेतकरी आणि व्यापारी चिंतेत असून कांदा लिलाव बंद आहेत. त्यामुळे या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी अजित पवार यांनी मंगळावीर बैठक बोलावली होती. परंतु, या बैठकीत कांद्याचा प्रश्न सुटलेला नाही. दरम्यान, कांदा प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे प्रतिनिधी पीयूष गोयल यांची भेट घेणार आहेत. यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले, अजित पवार कांद्याचा प्रश्न सोडवू शकणार नाहीत.

हे ही वाचा >> “मनोज जरांगेंच्या ‘या’ मागणीला आमचा विरोध”, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य

खासदार संजय राऊत म्हणाले, शेतकरी प्रश्नावर किंवा अन्य कुठल्याही मुद्द्यावर अजित पवार निष्कर्ष काढू शकत नाहीत. कारण त्यांच्या हातात काहीच नाही. महाराष्ट्रातला कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री पियूष गोयल इथल्या लोकांना दिल्लीत बोलवत आहेत. केंद्रीय मंत्री स्वतः आत्ताच इथे आले होते ना? तेव्हा त्यांनी काय केलं? राज्याचे कृषीमंत्री, वित्तमंत्री, मुख्यमंत्री या सगळ्यांनी आतापर्यंत काय केलं? ते गोयल स्वतःला मुंबईचे म्हणवतात, परंतु, आता ते अहमदाबादला जाऊन बसले आहेत. मुळात तुम्ही इथल्या शेतकऱ्यांसाठी काय केलंत ते सांगा.