शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू प्रविण राऊत यांच्यावर ईडीनं कारवाई केल्यानंतर त्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या गोवा निवडणुकांच्या निमित्ताने गोव्यात असलेले संजय राऊत यांनी भाजपावर परखड शब्दांत निशाणा साधला आहे. एबीपीशी बोलताना संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवर आणि भाजपावर टीका करतानाच सरकारवर आरोप करणारे उकिरड्यावरचे कुत्रे असल्याचं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“तुम्हालाही सत्तेतून जायचंय हे लक्षात ठेवा”

ईडीनं महाराष्ट्रात केलेल्या छापेमारीवरून संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. “माझ्या कुटुंबावर आत्ताही कारवाई चालू आहे. चालू द्या. त्यांनी ठरवलंय की केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम करायचं. खोट्या केसेस करायच्या. बायका-मुलांना छळायचं. त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या. तुमचं हे राजकारण तुम्हाला लखलाभ होवो. पण कधीतरी तुम्हालाही सत्तेतून जायचंय हे लक्षात ठेवा”, असं राऊत म्हणाले.

“तुमची माझ्याशी लढाई, माझ्याशी लढा”

प्रविण राऊत यांच्यावरील कारवाईवरून संजय राऊतांनी भाजपाला आव्हान दिलं आहे. “दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत तुमचे हवालाचे पैसे कुठून कसे पोहोचवले जातात. दिल्लीत नरपत नावाची जी व्यक्ती आहे त्याच्याकडे केंद्रीय मंत्र्यांपासून महाराष्ट्राच्या प्रमुख लोकांचे पैसे कसे आहेत त्याची सगळी माहिती आहे. पण मी कुणाच्या कुटुंबापर्यंत जात नाही. तुम्ही जात आहात. आमचंही राज्य येईल. दिल्लीत कुणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. तुम्हाला आम्हाला तुरुंगात टाकायचं असेल तर टाका. पण तुम्ही निरपराध लोकांना का त्रास देताय? तुमची लढाई माझ्याशी आहे, तर माझ्याशी लढा”, असं राऊत म्हणाले.

“कुछ मिला क्या?”; निकटवर्तीयांवरील ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांचा सवाल

“मला मुंबईत येऊ द्या, मी पाहातो काय करायचं ते.. अनेकांच्या कुटुंबातले घटक त्यात अडकले आहेत. पण मला असं वाटत नाही की त्यांची मुलं तुरुंगात जावीत. त्यांच्या बायका-मुलांवर आरोप व्हावेत”, असं सूचक विधान संजय राऊतांनी यावेळी बोलताना केलं.

“भाजपानं स्वत:चा आत्मा तपासून पाहावा”

“भाजपानं स्वत:चा आत्मा तपासून घ्यायला पाहिजे. अटल बिहारी वाजपेयींनी स्थापन केलेला पक्ष हाच आहे का? देवेंद्र फडणवीस हे एक संस्कारी नेते होते. पण गेल्या काही दिवसांत त्यांचाही तोल गेलाय. चार-पाच पंटर घेऊन ते मुंबई-महाराष्ट्रात राजकारण करत आहेत. प्रत्येकाला राजकारणात या गोष्टींना सामोरं जावं लागतं. तुम्ही कितीही खोटं बोललात, तरी लोकं आम्हाला ओळखतात. ज्यांच्या तोंडातून हे आरोप करत आहेत, ते उकीरड्यावरचे कुत्रे आहेत. त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाहीत. ते खोटे कागदपत्र बनवतात, खोटे आरोप करतात. करू द्या. माझा न्यायालयावर विश्वास आहे”, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपावर आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams bjp on ed raid action on brother pravin in goa election campaign pmw