सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत दिलेल्या निकालावरून राज्यात दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर खोचक शब्दांत टीका केली. पोपट मेला आहे, पण उद्धव ठाकरेंना हे कुणी सांगत नाही, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला. तसेच, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’च्या नव्या आवृत्तीत केलेल्या टीकेचाही फडणवीसांनी उल्लेख केला. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.
“फडणवीस झोपलेल्या लोकांसमोर बोलत होते”
“शरद पवारांच्या पुस्तकात देवेंद्र फडणवीसांवरही काही वाक्य आहेत. तीही त्यांनी वाचून दाखवायला हवी होती. खिल्ली कशावर उडवायला हवी? काल त्यांच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अर्धे लोक झोपलेले होते. झोपलेल्या लोकांसमोर बोललेत ना ते. त्यांचे मोठमोठे नेते झोपले होते, काही जांभया देत होते. अशा मेलेल्या कार्यकर्त्यांसमोर हे आमची खिल्ली उडवतात. पाहू ना”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
“पोपट मेलाच आहे, पण…”
“घटनाबाह्य सरकारचा पोपट मेलाच आहे. पण त्या पोपटाला ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न हे पुन्हा बेकायदेशीरपणे करत आहेत. आम्हाला विधानसभा अध्यक्षांविषयी अत्यंत आदर आहे. ते घटनात्मक पदावर बसले आहेत. पण शेवटी घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्ती राजकीयच असतात. इथे धोका असतो. ते पद फार महत्त्वाचं आहे. विधानसभा अध्यक्ष महात्मा आहेत. त्यांच्याकडून आम्हाला चांगल्या निर्णयाची अपेक्षा आहे. चांगल्या म्हणजे कायदेशीर. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तेच”, अशी खोचक टीकाही राऊतांनी केली.
“ताबडतोब निवडणुका घ्या, मग कळेल”
“पोपट कुणाचा उडतोय आणि कोणत्या वाघाची गर्जना होतेय हे कळेल त्यांना. कृषी उत्पन्न बाजार समितीत जे चित्र दिसलं ही फक्त झांकी आहे. ताबडतोब निवडणुका घ्या, मग कुणाचा मेलाय, हे ताबडतोब जनता दाखवेल तुम्हाला”, असं आव्हानच राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे.
“या देशात ३६ राज्य आहेत. ३६ मधल्या १६ चा आकडा काय घेऊन सांगताय? किती नावं घेऊ मी? यांचं डोकं ठिकाणावर आहे का? तुमच्याकडे काय आहे? एक गुजरात आणि उत्तर प्रदेश आहे. बाकी काय आहे तुमच्याकडे? तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं राज्य हिमाचल प्रदेशही तुम्ही जिंकू शकला नाहीत”, अशीही टीका राऊतांनी केली.